आयुक्तांच्या आदेशाला हरताळ? कृष्णानगर प्रभागात माजी नगरसेविकेचा फलक अद्याप कायम



 महाराष्ट्र जनभूमी | विशेष वृत्त

पिंपरी चिंचवड : मार्च २०२२ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका बरखास्त झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात महापालिकेच्या वतीने सर्व माजी नगरसेवकांचे नामफलक काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार शहरातील बहुतांश ठिकाणी नामफलक हटविण्याची कारवाईही करण्यात आली.

मात्र, फ-क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या कृष्णानगर प्रभाग क्र. ११ मध्ये माजी नगरसेविका अश्विनी भीमा बोबडे यांचा नामफलक आजही दिमाखात उभा असल्याचे समोर आले आहे. यामुळे महापालिकेच्या प्रशासनातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, “महापालिकेच्या आदेशानंतर सर्वत्र फलक काढण्यात आले, मग हा एकच फलक का कायम आहे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. ही बाब प्रशासनाची चूक आहे की संबंधित पदाधिकाऱ्यांचा पदावरील हव्यास, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.

यासोबतच आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशीही मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास शासनाच्या निर्णयाची पायमल्ली होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, लोकप्रतिनिधींनी पदावरून पायउतार झाल्यानंतर स्वतःहून असे फलक काढणे ही नैतिक जबाबदारी असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे.

आता तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका या उर्वरित अनधिकृत फलकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडे नवीन जरा जुने