जागतिक हिवताप दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिका व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन...



संत तुकाराम नगर परिसरात नागरिकांमध्ये हिवताप प्रतिबंध व स्वच्छतेबाबत करण्यात आली जनजागृती

पिंपरी चिंचवड : जागतिक हिवताप दिनानिमित्त आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका पदव्युत्तर संस्था व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) यांच्या वतीने संत तुकाराम नगर तसेच रुग्णालय परिसरात हिवताप (मलेरिया) जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये हिवताप प्रतिबंध, नियंत्रण आणि स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.

प्रभात फेरीदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या यावर्षीच्या “हिवताप निर्मूलनासाठी कटिबद्ध – आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे!” या घोषवाक्याचा प्रसार करण्यात आला. तसेच “कोरडा दिवस पाळा, हिवताप टाळा”, “घराभोवती पाणी साठू देऊ नका”, “मच्छरदाणीचा वापर करा” आणि “पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करा” अशा घोषणा देत प्रतिबंधात्मक उपायांची माहिती नागरिकांना देण्यात आली. हिवताप हा डासांमुळे होणारा आजार असून योग्य काळजी आणि सातत्यपूर्ण जनजागृतीद्वारे त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते, असा संदेशही यावेळी देण्यात आला.

या प्रभात फेरीचे आयोजन पदव्युत्तर संस्था व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय प्रशासन, जनआरोग्य वैद्यकशास्त्र विभागाचे (कम्युनिटी मेडिसिन) प्राध्यापक व कनिष्ठ निवासी डॉक्टर, यशवंतराव चव्हाण स्मृती परिचर्या विज्ञान संस्था महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी तसेच कुटुंब कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून करण्यात आले.

सदर कार्यक्रमास पदव्युत्तर संस्था व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे तसेच जनआरोग्य वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा विभागप्रमुख डॉ. हर्षल पांडवे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहयोगी प्राध्यापक डॉ. मुकेश बावा, सहाय्यक प्राध्यापक सॅमसन लिओ यू, आरोग्य सहाय्यक माणिक चव्हाण, एमपीडब्ल्यू संतोष काशीद तसेच कनिष्ठ निवासी डॉक्टर उपस्थित होते. यावेळी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आरोग्याबाबत सतर्क राहण्याचे तसेच हिवतापाची लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

डंख छोटा, धोका मोठा!

हिवताप (मलेरिया) हा मादी ॲनोफिलीस डासाच्या चाव्याने पसरणारा आजार आहे. याची लक्षणे जरी सामान्य वाटत असली तरी दुर्लक्ष केल्यास गंभीर ठरू शकतात.

हिवतापाची लक्षणे अशी ओळखावीत:

* सतत किंवा अधूनमधून येणारा ताप

* थंडी वाजणे आणि अंगावर शहारे येणे

* डोकेदुखी आणि अंगदुखी

* मळमळ किंवा उलट्या

* अशक्तपणा व थकवा जाणवणे

* अचानक घाम येणे

हिवताप टाळण्यासाठी ह्या उपाययोजना कराव्यात:

* घराभोवती किंवा परिसरात पाणी साचू देऊ नका

* आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळा

* मच्छरदाणीचा नियमित वापर करा

* पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करा

* खिडक्या-दरवाज्यांना जाळ्या लावा

* डास प्रतिबंधक क्रीम/औषधांचा वापर करा

* परिसर स्वच्छ ठेवा आणि कचरा साचू देऊ नका

थोडे नवीन जरा जुने