इराण–अमेरिका युद्ध : युद्ध कधी संपेल याबाबत अजूनही अनिश्चितता कायम ?

 


Iran war : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता पाचव्या आठवड्यात प्रवेशले असून परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. या संघर्षात दोन्ही बाजूंना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. जरी दोन्ही देश उघडपणे मान्य करत नसले तरी, युद्ध थांबवण्याची इच्छा दोन्हींकडून दिसून येत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सूचित केले आहे की पुढील २–३ आठवड्यांत अमेरिकन सैन्य इराणमधून माघार घेऊ शकते. दुसरीकडे, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनीही गुप्त चर्चांची कबुली देत सांगितले की भविष्यात पुन्हा संघर्ष होणार नाही याची खात्री मिळाल्यास इराण युद्ध समाप्त करण्यास तयार आहे.

दरम्यान, बेरूत (लेबनॉन) येथे जोरदार स्फोट झाले असून धुराचे मोठे लोट दिसून आले. इस्रायल ने दावा केला आहे की त्यांनी हिजबुल्लाह च्या वरिष्ठ कमांडरला लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये किमान ८ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की लष्करी कारवाई अजून सुरूच राहणार आहे आणि दहशतवादी नेटवर्क पूर्णपणे नष्ट होईपर्यंत ती थांबणार नाही.


तेहरान येथेही स्फोटांचे आवाज ऐकू आले असून एअर डिफेन्स सिस्टम सक्रिय करण्यात आले आहे. जागतिक पातळीवर या संघर्षाबाबत चिंता वाढत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स ने इशारा दिला आहे की संघर्ष सुरू राहिल्यास ते अमेरिकेच्या महत्त्वाच्या संस्थांना लक्ष्य करू शकतात. त्यांनी Microsoft, Google, Apple, Intel, IBM, Tesla आणि Boeing यांसारख्या कंपन्यांची नावे घेतली आहेत.

याचदरम्यान, डोनाल्ड ट्रंप यांनी होर्मुझ सामुद्रधुनीशी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले आहे. या विधानामुळे जागतिक तेलपुरवठ्याबाबत चिंता अधिकच वाढली आहे. एकूणच, लष्करी कारवायांसोबत कूटनीतिक प्रयत्नही सुरू आहेत, मात्र युद्ध कधी संपेल याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.

थोडे नवीन जरा जुने