!-- afp header code starts here --> वडगाव मावळ येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जोरदार आंदोलन; भोंदू बाबांविरोधात व महागाईविरोधात निषेध

वडगाव मावळ येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जोरदार आंदोलन; भोंदू बाबांविरोधात व महागाईविरोधात निषेध


वडगाव मावळ : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज वडगाव मावळ येथील तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. ही निदर्शने पक्षाचे पुणे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

या वेळी बोलताना कॉ. दराडे यांनी राज्यात भोंदू बाबांचा वाढता सुळसुळाट आणि त्यांना मिळणारे राजकीय संरक्षण यावर तीव्र टीका केली. अशोक खरात यांसारख्या भोंदू बाबांच्या संपर्कात राज्याचे मुख्यमंत्री तसेच विधानसभेतील अनेक आमदार असल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले. तसेच सरकारमधील काही मंत्र्यांनी भोंदू बाबांच्या सांगण्यावरून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी कृत्ये केल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

महिला आयोगाच्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींनीही महिलांना न्याय देण्याऐवजी भोंदू बाबांकडे पाठविल्याच्या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.

याशिवाय, आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे कारण पुढे करून घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात येत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. गॅससाठी लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी रांगेत उभे राहून नागरिकांचे मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर येत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. एकीकडे सरकार व प्रशासन तुटवडा नसल्याचे सांगत असताना, प्रत्यक्षात गॅस कार्यालयांपुढे लागलेल्या रांगांमुळे सत्य परिस्थिती स्पष्ट होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.


या सर्व बाबींचा तीव्र निषेध नोंदवत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा दराडे, किसान सभेचे जिल्हा कमिटी सदस्य कॉ. बाळासाहेब शिंदे, डॉ. बाबासाहेब देशमुख, श्रीरंग जाधव, तुकाराम भांगे, अनिता करे, अर्चना गवई, विठ्ठल कदम, सोमनाथ जाधव, जनाबाई जाधव, अंजना खांदवे, अर्चना जाधव, वैशाली पारधी, सुखदेव भांगे, पार्वती सुरवसे, पार्वती घोगरे, चंद्रकांत जाधव, आकाश गावडे, पांडुरंग खांदवे, बबन गावडे, सोनाली जाधव आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

आंदोलनादरम्यान महिलांनी तहसीलदार कार्यालयासमोर चुल पेटवून भाकरी करून सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बबन गावडे यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने