पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांकडून आरटीई (RTE) कायदा २००९ आणि महाराष्ट्र फी विनियमन कायदा २०११ चे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या गैरप्रकारांची चौकशी करून दोषी शाळांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी 'आप'च्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी 'आप'चे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट आणि महासचिव स्वप्निल जेवळे उपस्थित होते.
निवेदनातील प्रमुख मुद्दे आणि आरोप:
RTE साहित्याची बेकायदेशीर विक्री: इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश आणि बूट मोफत देणे बंधनकारक असताना, शाळा पालकांकडून कोणतीही पावती न देता रोख रक्कम घेऊन या साहित्याची विक्री करत आहेत.
अपारदर्शक PTA निवडणूक: शासनाच्या नियमानुसार पालक-शिक्षक संघाच्या (PTA) ९ सदस्यांची निवड पारदर्शकपणे होणे आवश्यक आहे. मात्र, शाळा व्यवस्थापन आपल्या मर्जीतील पालकांची गुप्तपणे निवड करून फी वाढीचे बेकायदेशीर निर्णय घेत आहे.
TET अपात्र शिक्षकांची नेमणूक: नियमानुसार १ ली ते ८ वी साठी TET उत्तीर्ण शिक्षक असणे अनिवार्य आहे. परंतु, अनेक शाळांमध्ये पात्रता नसलेले किंवा केवळ १० वी/१२ वी उत्तीर्ण शिक्षक शिकवत आहेत.
RTE विद्यार्थ्यांकडून फी वसुली: २५% आरटीई कोट्यातील गरीब विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी, बिल्डिंग फंड, कॉम्प्युटर आणि ई-लर्निंग फीच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जात आहेत.
आर्थिक ऑडिटमध्ये गोपनीयता: फी विनियमन कायद्यानुसार दरवर्षी ऑडिट करून जमा-खर्च जाहीर करणे बंधनकारक असतानाही शाळा ही माहिती लपवत आहेत.
आम आदमी पार्टीच्या प्रमुख मागण्या:
१. त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून ३० दिवसांत सर्व शाळांची तपासणी करावी.
२. दोषी शाळांवर दंडात्मक कारवाई करून पालकांचे पैसे परत करावेत.
३. PTA निवडणूक व्हिडिओ शूटिंगसह घेण्याचे आदेश द्यावेत.
४. TET अपात्र शिक्षकांना तात्काळ सेवेतून कमी करावे.
५. गैरव्यवहार करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करावी.
"पिंपरी-चिंचवडमधील हजारो पालकांची आर्थिक लूट होत असून आरटीई कायद्याचे धिंडवडे काढले जात आहेत. जर १५ दिवसांत यावर ठोस कारवाई झाली नाही, तर आम आदमी पार्टी पालकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करेल."
— वैजनाथ शिरसाट (शहराध्यक्ष, आप, पिंपरी-चिंचवड)
या निवेदनाच्या प्रती PCMC आयुक्त, शिक्षण संचालक (प्राथमिक) आणि DFRC अध्यक्षांना देखील पाठवण्यात आल्या आहेत.
