पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथील इंद्रायणी नदीवरील पाणी उपसा केंद्र आणि जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा होणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, मोशी प्राधिकरण परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोशी प्राधिकरण, सेक्टर ४, ६, ९, ११, संतनगर, मोशीगाव, डुडुळगाव, चऱ्होली आदी भागांत दूषित आणि आरोग्यास अपायकारक पाणीपुरवठ्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत.
या संदर्भात _सामाजिक कार्यकर्ते श्री. रविंद्र आळणे (अथर्व वॉटर टेक सोल्युशन्स)_ यांनी पुढाकार घेत विविध भागांतून पाण्याचे नमुने गोळा करून त्यांची सरकारी मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये तपासणी केली. या तपासणीत पाण्यात मोठ्या प्रमाणावर बॅक्टेरिया आणि घातक घटक आढळून आले असून, हे पाणी थेट मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परिसरातील अनेक सोसायट्यांतील नागरिकांनी पाण्याची भीषण स्थिती उघड करताना सांगितले की, काही ठिकाणी पाण्यात अळ्या, जंतू, गढूळपणा, तसेच पिवळसर आणि हिरवट रंग दिसून येतो. शिवाय पाण्याला उग्र दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. नागरिकांनी या संदर्भातील फोटो व व्हिडिओ पुरावे सादर करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या गंभीर प्रश्नावर _श्री. रविंद्र आळणे, श्री. दीपक नाईक, श्री. नितीन यादव आणि श्री. किशोर थोरात_ यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. विविध माध्यमांतूनही हा विषय उचलण्यात आला असून, अनेक सोसायट्यांनी अधिकृत पत्रव्यवहार व ई-मेलद्वारे तक्रारी नोंदवल्या आहेत.
दि. ४ एप्रिल २०२६ रोजी परिसरातील नागरिक आणि सोसायटीधारकांनी एकत्र येत _महापौर मा. श्री. रवी लांडगे_ यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. _दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, पोटदुखी, जुलाब, उलट्या, मळमळ अशा तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे._
विशेष म्हणजे, ही समस्या नवीन नसून मागील वर्षी फेब्रुवारी ते मे २०२५ दरम्यानही मोठ्या प्रमाणावर समोर आली होती. पावसाळ्यात इंद्रायणी नदी प्रवाही असल्यामुळे परिस्थिती सुधारते; मात्र पावसाळा संपल्यानंतर पुन्हा दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डिसेंबर २०२५ पासून पुन्हा तक्रारींचा भडिमार सुरू झाला आहे.
परिसरातील नागरिकांची एकमुखी मागणी आहे की, पूर्वीप्रमाणे पवना नदीतून स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा पुन्हा सुरू करावा. तसेच चिखली-निघोजे प्रकल्पाच्या कार्यक्षमतेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
या आंदोलनात _सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ आणि जागरूक नागरी महासंघ_ या संस्थांनीही सक्रिय सहभाग घेत प्रशासनावर दबाव वाढवला आहे. तरीही महानगरपालिका प्रशासनाकडून अपेक्षित ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
दरम्यान, _नगरसेविका सौ. नम्रताताई लोंढे आणि योगेश भाऊ लोंढे_ यांच्या पुढाकाराने ६ एप्रिल रोजी आयुक्तांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती; मात्र ती बैठक काही कारणास्तव होऊ शकली नाही. त्यानंतर १० एप्रिल रोजी _स्थायी समिती सभापती श्री. अभिषेक बारणे_ यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत नम्रताताईंनी नागरिकांच्या समस्यांवर ठाम भूमिका मांडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. श्री. बारणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कारवाईचे निर्देश दिले.
याचवेळी _श्री. शिवराज भाऊ लांडगे_ यांनी महानगरपालिकेचे _मुख्य अभियंता श्री. ओंबासे_ यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. तसेच ११ एप्रिल रोजी _नम्रताताई लोंढे यांच्या उपस्थितीत चिखली जलशुद्धीकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण आढावा घेण्यात आला._ यावेळी अधिकारी श्री. प्रशांत जगताप, कर्मचारी, तसेच नागरिक उपस्थित होते. सततच्या दूषित पाणीपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, लवकरात लवकर शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास सर्व सोसायटीधारक व नागरिक मोठ्या संख्येने महानगरपालिका कार्यालयावर एकत्र येऊन आंदोलन छेडतील.
_पाणी ही मूलभूत गरज असून त्याची गुणवत्ता राखणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नावर तातडीने प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही._
