MGID Header Code
Code End

जवाब दो आंदोलन – पिंपरी चिंचवड

 


शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे जाहीर वाचन व जनसंवाद

पिंपरी चिंचवड : दि. १३ मे रोजी दत्तवाडी, आकुर्डी येथे ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या निमित्ताने जाहीर वाचन व जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधान जागरचे कार्यकर्ते सुरेश बावनकर यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेना (शिंदे गट) चे आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या दिलेल्या धमक्यांचा निषेध व्यक्त केला. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्यावर केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याबद्दल सरकारचाही निषेध करण्यात आला.

यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश बेरी यांनी पुस्तकातील काही भागाचे जाहीर वाचन केले. आपल्या भाषणात ते म्हणाले, “शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांचे राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसांना — रयतेला — आपले वाटत होते. हेच त्यांचे ठळक वेगळेपण आहे. खरं तर एखादे राज्य चांगले की वाईट हे ठरविण्याची सर्वोत्तम कसोटी कोणती? ज्या राज्यातील प्रजेला, बहुजनांना हे राज्य आपले आहे असे वाटते, ते राज्य उत्तम समजावे. आपल्या देशात जे काही चालले आहे, ते आपल्यासाठी चालले आहे असे बहुसंख्य जनतेला वाटते का? मला वाटते, याचे प्रामाणिक उत्तर ‘नाही’ असे आहे.”

यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिन देसाई यांनी आपले विचार मांडले. शेवटी शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमात ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाची विक्रीही करण्यात आली.

या कार्यक्रमाला सुधीर मुरुडकर, राम नलावडे, चेतन दळवी, आसिफ शेख, अमीन शेख, अॅड. शिंगोटे आणि सीमा बावनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने