स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त ग्रंथदान उपक्रम उत्साहात

 


पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे ग्रंथदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रभक्ती, सामाजिक जाणीव आणि वाचन संस्कृती संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने सलग बाराव्या वर्षी ग्रामीण व दुर्गम भागातील ग्रंथालयांना ग्रंथ भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार वाचन साहित्य उपलब्ध व्हावे, ग्रंथालये सक्षम व्हावीत आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने सहा संस्थांना ग्रंथदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मंडळाच्या सचिव अ‍ॅड. हर्षदा पोरे यांनी प्रास्ताविक करताना मंडळाच्या कार्याचा आढावा घेत ग्रंथदान उपक्रमामागील सामाजिक उद्देश स्पष्ट केला. ज्ञानदान हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर अ‍ॅड. हर्षदा पोरे, ग्रंथालय विभागाचे अध्यक्ष विश्वास करंदीकर आणि ज्येष्ठ सभासद जयश्री कदम यांच्या हस्ते विविध संस्थांच्या प्रतिनिधींना ग्रंथ संच सुपूर्द करण्यात आले.


हुतात्मा नाग्या कातकरी समाज विकास केंद्र (माळे), तोरणा राजगड परिसर समाज उन्नती न्यास (वेळे), उद्योगधाम (तळेगाव दाभाडे), विश्व हिंदू संचलित वनवासी विद्यार्थी वसतिगृह, स्वामी गुणेशानंद महाराज पुणेकर ग्रंथालय (ओतूरवाडी, हवेली) आणि भुलेश्वर मोफत वाचनालय (माळशिरस) या संस्थांना ग्रंथदान करण्यात आले.

मंडळाचे माजी सचिव प्रदीप पाटील यांनीही वैयक्तिक स्वरूपात दोन ग्रंथालयांना ग्रंथदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

भुलेश्वर मोफत वाचनालय, माळशिरस येथील संचालकांनी मनोगत व्यक्त करताना या ग्रंथदान उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचविणारा हा उपक्रम प्रेरणादायी असून भविष्यात आम्हीही अशा प्रकारचे उपक्रम राबवू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर रचित गीतांचा सांगीतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला. सौ. नेहा कुलकर्णी आणि स्वरसाधक समूहाने सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी सभागृह राष्ट्रप्रेमाच्या भावनेने भारावून गेले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुप्रिया होनप यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. शैलेश भिडे यांनी मानले. वंदे मातरम्‌ने कार्यक्रमाची सांगता झाली.

थोडे नवीन जरा जुने