जुन्नर तालुक्यात विवाहितेचा खून; गळफास घेतल्याचा बनाव केल्याचा आरोप


जुन्नर (रफिक शेख) : जुन्नर तालुक्यातील निमगाव तर्फे माळुंगे येथे एका विवाहितेचा खून करून आत्महत्येचा बनाव केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली नवनाथ पारखे (वय ३५) यांचा दि. १६ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ विकास वसंत पवार (रा. बल्लाळवाडी, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, नवनाथ बाजीराव पारखे (वय ४३, रा. निमगाव तर्फे माळुंगे) याने पत्नी रुपाली यांना शेतातील गोठ्यात नेऊन दोन्ही हातांनी गळा दाबून ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गळ्याला दोर बांधून गोठ्यातील लोखंडी पाईपला लटकावून आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम १०३(१) आणि २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून अटकेची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक किरण अवचर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गटकूळ यांनी पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.

थोडे नवीन जरा जुने