‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’
पिंपरी चिंचवड : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडकरांनी तुडुंब प्रतिसाद दिला.
दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी (२२ ऑगस्ट) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
‘भेसळमुक्त महाराष्ट्र, आरोग्यदायी महाराष्ट्र’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून ज्येष्ठ पत्रकार मयुरेश कोण्णूर यांनी तुकाराम मुंढे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
या कार्यक्रमात ‘नीट यूजी २०२६’ परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेली श्रावणी कृष्णकांत कुदळे, जागतिक शूटिंग स्पर्धेतील रौप्यपदक विजेती खेळाडू शौर्या दिलीप भरणे आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलेला क्षितीजय प्रवीण नप्ते यांचा तुकाराम मुंढे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रेरणा शिक्षण संस्थेतील इयत्ता नववीची विद्यार्थिनी महक जमू जहागिरदार हिने तुकाराम मुंढे यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वावर उत्स्फूर्त भाषण केले.
पत्रकार शफी पठाण लिखित ‘तुकाराम’ या पुस्तकातील मजकुराचे श्रीकांत चौगुले यांनी अभिवाचन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले.
सानिका कांबळे हिने आभार मानले.
या मुलाखतीत मुंढे यांनी, अन्नातील भेसळ, नागरिकांची जबाबदारी, नैतिकता, प्रशासनातील कार्यपद्धती, कर्तव्याला दिलेले महत्त्व आणि आतापर्यंतच्या प्रशासकीय प्रवासातील अनुभव अशा विविध मुद्द्यांवर परखड आणि अभ्यासपूर्ण मते व्यक्त केली.
तुकाराम मुंढे म्हणाले की...
झोपलेल्या व्यक्तीला जागं करता येतं. मात्र झोपल्याचं सोंग घेतलेल्या व्यक्तीला जागं करता येत नाही.
ज्ञान आणि माहितीच्या बाबतीत आपण चिकित्सक असतो. मात्र, अन्नपदार्थांच्या बाबतीत तोच चिकित्सकपणा दिसत नाही.
माणसाने शरीराने नव्हे तर वैचारिकदृष्ट्या देखील निरोगी असावे. भेसळ पदार्थांची असते. तशीच ती विचारांची देखील असते.
प्रत्येकवेळी प्रवाहाच्या विरुद्ध जाणं, हे शहाणपणाचं नाही. मात्र, योग्य प्रवाह ओळखणे आवश्यक आहे.
सध्याच्या डिजिटल युगात आपण काय ऐकतो, काय पाहतो, कोणते विचार आपल्यापर्यंत येतात आणि त्याचे आपण नेमके काय करतो हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
यापूर्वी माहिती मिळवण्यासाठी कष्ट पडत होते. आता तीच माहिती क्षणार्धात मोबाईलवर येते.
यातील ‘अल्गोरिदम’मुळे दुसरी बाजू समोर येत नाही, ती समजून घेतली पाहिजे. थेटपणे लाईक, फॉरवर्ड केल्याचा काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार केला पाहिजे.
मोबाईलमुळे घराघरात संवाद कमी झाला आहे. आपण मोबाईलमध्ये गुरफटून जात आहोत.
सोशल मीडियाच्या बाबतीत नवीन पिढी वेगवान आणि एनर्जी असणारी आहे. त्यांनी ‘रील’ऐवजी ‘रियालिटी’ काय आहे, याचा विचार केला पाहिजे.
अगोदर मी साधासुधा होतो. आताही तसाच आहे. आतून एक बाहेरून एक, असा माझा स्वभाव नाही. मी निस्वार्थीपणे सत्याचा स्वीकार करतो. जे काही करायचे, ते पारदर्शक पध्दतीने करायचे, अशी आई-वडिल आणि भावाची शिकवण आहे, त्याचे मी पालन करतो.
मला बदल्या आणि दबाव याची भीती वाटत नाही.
नियम हे केवळ बंधन नसून लोकहित साधण्यासाठीचे माध्यम आहे.
सगळेच अधिकारी काम करतात. कामाची पद्धत योग्य की अयोग्य हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी कधीही माझ्या आधीच्या अधिकाऱ्यांनी काय केले, हे पाहत नाही. तुलना करणे योग्य वाटत नाही. त्यापेक्षा आपण घेतलेल्या निर्णयांचा नागरिकांना अपेक्षित फायदा होतोय का, याचा विचार करणे जास्त महत्वाचे आहे.
हलाखीची परिस्थिती असू शकते. मात्र तशा परिस्थितीमुळे नैतिकतेशी तडजोड करणे योग्य ठरत नाही. तुम्ही गरीब आहात म्हणून चुकीचा मार्ग निवडणे हा पर्याय असू शकत नाही. तुमच्याकडे बौद्धिक प्रामाणिकपणा नसेल तर मिळणारे यश तात्पुरते असते आणि तेही चिरंतन टिकणारे नसते.
एखाद्या व्यक्तीला देवत्व देणे किंवा दानवत्व देणे खूप धोकादायक आहे. प्रत्येक जण माणूस आहे. तो चुकू शकतो.
“मी पब्लिक सर्व्हन्ट आहे. निवृत्तीनंतर काय करायचं, हे आत्ताच ठरवलेलं नाही आणि सर्वच गोष्टींचा आताच खुलासा करता येणार नाही.
तेंडूलकरपेक्षा
माझा भाऊ
खूपच मोठा
प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आणि पिंपरी पालिकेच्या प्रशासकीय सेवेत असताना कौतुकास्पद कामगिरी करणारे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे यांचा यावेळी महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
मुलाखतीत बोलताना, तुकाराम मुंढे यांनी आपल्या बंधूंचे म्हणजेच अशोक मुंढे यांचं आयुष्यातील महत्वपूर्ण स्थान अधोरेखित केलं.
सचिन तेंडुलकरच्या भावापेक्षा माझा भाऊ खूप मोठा आहे, असे म्हणत त्यांनी अशोक मुंढे यांच्या कार्याविषयी अभिमान व्यक्त केला. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
