जुन्नर (रफिक शेख) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत जुन्नर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. यासाठी Pre-SIR Mapping, Progeny Mapping, DSE तपासणी तसेच Blur Photo Update करण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत.
मतदार नोंदणी अधिकारी, १९५ जुन्नर विधानसभा मतदारसंघ यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार पर्यवेक्षक, BLO अधिकारी, पोलीस पाटील, आशा सेविका, राजकीय पक्षांचे BLA प्रतिनिधी, स्वस्त धान्य दुकानदार आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आदेशानुसार २००३ ते २०२५ या कालावधीत नव्याने नोंद झालेल्या मतदारांचे Pre-SIR Mapping व Progeny Mapping करण्यात येणार आहे. तसेच मतदार यादीतील अस्पष्ट छायाचित्रे (Blur Photo) अद्ययावत करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्या आढावा बैठकीनंतर या कामांना गती देण्यात आली असून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या वेळेत १०० टक्के काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दि. ९ आणि १० मे २०२६ रोजी विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार असून या कालावधीत सर्व BLO व पर्यवेक्षकांनी आपल्या भागात उपस्थित राहून मोहिमेचे काम पूर्ण करायचे आहे. एका गावात दोन किंवा अधिक मतदान केंद्र असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या कलम ३२ अंतर्गत कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
.png)