- नवी सांगवीत १४ मे २०२६ रोजी 'भव्य रोजगार मेळावा'
- राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ५ हजारांहून अधिक पदांसाठी थेट भरती
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींना नामांकित राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवार, दिनांक १४ मे रोजी सांगवी येथे 'भव्य रोजगार मेळावा २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग (पुणे), प्रतिभा महिला प्रतिष्ठान आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा होणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.
नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल येथे सकाळी ९ वाजल्यापासून या मेळाव्याला सुरुवात होईल. मेळाव्याचे उद्घाटन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रसादजी लोढा यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यात मुख्यत्वे पुणे, पिंपरी-चिंचवड व चाकण तसेच महाराष्ट्रातील विविध औद्योगिक पट्ट्यातील नामवंत आयटी, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल आणि बँकिंग क्षेत्रातील नामांकित कंपन्या थेट मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड करणार आहेत.
पाचवी ते दहावी, तसेच बारावी, पदवीधर, पदव्युत्तर तसेच आयटीआय आणि डिप्लोमाधारक पात्र उमेदवारांना यात सहभागी होता येईल. उमेदवारांनी आपल्या बायोडाटा आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ५ हजारांपेक्षा जास्त रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९९२१०९९२१४, ७३५००७९९५५, ९८५०१७११११ या क्रमांकावर संपर्क साधावा. दरम्यान, या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांना आयोजकांच्या वतीने विशेष 'सहभाग प्रमाणपत्र' देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले
प्रतिक्रिया
"युवकांना रोजगाराचे हक्काचे व्यासपीठ आणि दर्जेदार संधी मिळवून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देऊन आपल्या तरुणांच्या हाताला काम आणि कौशल्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करावी."
— शंकर जगताप
(आमदार - चिंचवड विधानसभा)
