!-- afp header code starts here --> पिंपळे गुरव येथील 8 टू 80 गार्डनजवळील अंडरपासमध्ये वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

पिंपळे गुरव येथील 8 टू 80 गार्डनजवळील अंडरपासमध्ये वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

 


पिंपरी चिंचवड : पिंपळे गुरव येथील सुदर्शन नगर चौकात महानगरपालिकेमार्फत नाशिक फाटा ते हिंजवडी बीआरटीएस मार्गावर विकसित करण्यात आलेल्या अंडरपासमध्ये वारंवार गंभीर अपघात होत असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली आहे.

सदर अंडरपासमध्ये सामान्य वाहनांसाठी रस्त्यासोबत स्वतंत्र बीआरटीएस मार्गिका देखील आहे. नियमांनुसार अत्यावश्यक सेवांच्या वाहनांखेरीज इतर कोणत्याही खासगी वाहनांना या मार्गिकेत प्रवेश नाही. मात्र प्रत्यक्षात अनेक खासगी वाहने या मार्गिकेचा वापर करीत असल्याचे दिसून येते.

या ठिकाणी बीआरटीएस मार्गिकेत तीव्र वळण (शार्प टर्न) तसेच अपुरा प्रकाश असल्यामुळे आजपर्यंत अनेक अपघात घडले आहेत. यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून मागील आठवड्यातच येथे तीन अपघात झाले. त्यापैकी दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आयान आयाज शेख (वय 21) या तरुणाचा देखील या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या गंभीर परिस्थितीचा विचार करून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सदर अंडरपास परिसरात आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, पुरेसा प्रकाश व्यवस्था करावी, इशारा फलक व वेग नियंत्रण साधने बसवावीत तसेच बीआरटीएस मार्गिकेत खासगी वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

थोडे नवीन जरा जुने