!-- afp header code starts here --> खामगावमध्ये जमिनीच्या वादातून तंटामुक्ती अध्यक्षावर कुऱ्हाडीने हल्ला; तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

खामगावमध्ये जमिनीच्या वादातून तंटामुक्ती अध्यक्षावर कुऱ्हाडीने हल्ला; तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा


जुन्नर (रफिक शेख) : जुन्नर तालुक्यातील खामगाव येथे जमिनीच्या वादातून तंटामुक्ती अध्यक्षावर कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.


जुन्नर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर चंद्रकांत घोलप (वय ३५, रा. खामगाव, ता. जुन्नर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दि. ४ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास खामगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गट क्रमांक ३८१ मधील जागेवर हा प्रकार घडला.


फिर्यादीनुसार, संबंधित जागेवर करण्यात आलेले अनधिकृत तारांचे कंपाऊंड काढण्यासाठी ग्रामस्थ, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष संदीप रामदास घोलप उपस्थित होते. यावेळी आरोपी प्रसाद संतोष कोकणे, संतोष गणू कोकणे आणि मयूर संतोष कोकणे यांनी रागाच्या भरात वाद घालत शिवीगाळ केली.


वाद वाढल्यानंतर आरोपी प्रसाद कोकणे याने तंटामुक्ती अध्यक्ष संदीप घोलप यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांच्या डोक्यात वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात संदीप घोलप गंभीर जखमी झाले. तसेच इतर आरोपींनी ग्रामस्थांना शिवीगाळ करत गोंधळ घातला. आरोपी संतोष कोकणे याने फिर्यादी सागर घोलप यांनाही दगड मारून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम १०९(१), ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी आरोपी संतोष गणू कोकणे आणि मयूर संतोष कोकणे यांना अटक केली असून त्यांची अटक नोंद करण्यात आली आहे. तर अन्य आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, आरोपी प्रसाद संतोष कोकणे याच्याविरुद्ध यापूर्वीही जुन्नर पोलीस ठाण्यात मारहाण, विनयभंग, पाठलाग आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करीत असून पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. खामगाव परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



थोडे नवीन जरा जुने