!-- afp header code starts here --> जुन्नरमध्ये भरदिवसा कोयता व लोखंडी हत्यारे घेऊन दहशत; सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

जुन्नरमध्ये भरदिवसा कोयता व लोखंडी हत्यारे घेऊन दहशत; सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल


जुन्नर (रफिक शेख) : जुन्नर शहरातील सदाबाजारपेठ परिसरात भरदिवसा कोयता, लोखंडी रॉड आणि अँगलसारखी हत्यारे हातात घेऊन दहशत माजविल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ जून २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सदाबाजारपेठ येथील इरफान हलवाई यांच्या बांगड्याच्या दुकानासमोर ही घटना घडली. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी कैलास माधव केंद्रे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

गुन्ह्यात अरबाज हमीद हलवाई, मुज्जमिल इरफान हलवाई, इरफान मजीद हलवाई, शायरा मजीद हलवाई, मुस्कान अरबाज हलवाई आणि मोहसीन इकबाल अत्तार (सर्व रा. सदाबाजारपेठ, जुन्नर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, अरबाज हलवाई आणि मुज्जमिल हलवाई हे हातात कोयता घेऊन अंगावर धावून जात होते, तर इरफान हलवाई हा लोखंडी रॉड असलेले चैनव्हील हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरत होता. तसेच मोहसीन अत्तार हा लोखंडी अँगल घेऊन फिरत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. संबंधितांनी एकत्र जमून मोठमोठ्याने आरडाओरड, शिवीगाळ करून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी इरफान मजीद हलवाई याला अटक केली असून इतर आरोपींबाबत पुढील कारवाई सुरू आहे.

दरम्यान, आरोपींपैकी मुज्जमिल इरफान हलवाई याच्याविरुद्ध यापूर्वी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच मोहसीन इकबाल अत्तार याच्याविरुद्धही यापूर्वी विविध गुन्हे दाखल असून त्याच्यावर बीएनएसएस कलम १२६ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार हिले करीत असून पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. जुन्नर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

थोडे नवीन जरा जुने