आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील लोहगाव मधील अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या तीन विभागांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन ( एन.बी.ए. ) समिती कडून तीन वर्षांसाठी मानांकन प्राप्त झाले आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर एन.बी.ए. मानांकनाला फार महत्त्व आहे. या निमित्त परिसरातून व्यवस्थापन आणि सर्व संबंधित घटकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाविद्यालयातील सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या शाखांना मानांकन मिळाले आहे.या तीनही पदवी अभ्यासक्रमांना राष्ट्रीय मानांकन मंडळ (एन बी ए) कडून २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी तीन वर्षांची मान्यता प्राप्त झाली आहे. यामुळे ‘अजिंक्य डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची’ गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
एन.बी.ए. ही संस्था राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रमांना मानांकन देण्याचे काम करते. समितीच्या डॉ. मित्तल यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यीय समितीने अजिंक्य डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षण प्रणाली, सर्व सुविधा, प्राध्यापकांची गुणवत्ता व उपलब्धता, प्रत्येक विभागातील कागदपत्रांची तपासणी केली. यामध्ये टीचिंग-लर्निंग प्रोसेस, रिसर्च अँड कन्सल्टन्सी, स्टुडंट सक्सेस रेट, करिअर गायडन्स, प्लेसमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, प्रोजेक्ट, विद्यार्थ्यांचा फिडबॅक, आउटकम बेस्ड एज्युकेशन यांचे मूल्यमापन केले. त्याचबरोबर विविध विभागांना भेट दिली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ अजिंक्य डी. वाय. पाटील यांनी सर्वांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ अजिंक्य डी वाय पाटील यांनी अभिनंदन करताना सांगितले की, ही मान्यता संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनाची दखल आहे. त्यांनी भविष्यातही संस्था शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा कायम राखेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ आर के जैन यांनी महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन करत सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आदींनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले. या यशामागे संपूर्ण टीमचे समर्पण, कठोर परिश्रम आणि गुणवत्तेबाबतची बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य डॉ. एफ. बी. सय्यद यांनी या यशाचे श्रेय संस्थेचे व्यवस्थापन, सर्व विभाग प्रमुख, शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्यांना दिले. एन. बी. ए. मान्यता ही संस्थेच्या परिणामाधारित शिक्षण आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता वृद्धीच्या प्रयत्नांची पावती असल्याचे त्यांनी सांगितले.
मूल्यांकन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. जैन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फारूक सय्यद, सर्व डीन, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
