!-- afp header code starts here --> पिंपळे गुरव येथील ८ टू ८० गार्डनजवळील बीआरटीएस अंडरपासमध्ये वारंवार अपघात; तातडीने उपाययोजनांची मागणी

पिंपळे गुरव येथील ८ टू ८० गार्डनजवळील बीआरटीएस अंडरपासमध्ये वारंवार अपघात; तातडीने उपाययोजनांची मागणी

PCMC 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नाशिक फाटा ते हिंजवडी या बीआरटीएस मार्गावर पिंपळे गुरव येथील सुदर्शन नगर चौकात ८ टू ८० गार्डनजवळ अंडरपास विकसित करण्यात आला आहे. या अंडरपासमध्ये सर्वसामान्य वाहनांसाठी स्वतंत्र रस्ता असून बीआरटीएससाठी स्वतंत्र मार्गिका आहे. या बीआरटीएस मार्गिकेत केवळ अत्यावश्यक सेवांची वाहने व बीआरटीएस बस यांनाच प्रवेश असताना अनेक खासगी वाहने नियमांचे उल्लंघन करून या मार्गाचा वापर करत आहेत.

या बीआरटीएस मार्गिकेत तीव्र वळण (शार्प टर्न) तसेच अंधार असल्यामुळे आजपर्यंत अनेक भीषण अपघात घडले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील आठवड्यातच येथे तीन अपघात झाले असून त्यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांपैकी २१ वर्षीय आयान आयाज शेख याचाही समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांनी या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन अंडरपास परिसरात अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काट्यांनी केली आहे. तसेच बीआरटीएस मार्गिकेत खासगी वाहनांचा प्रवेश पूर्णपणे बंद करण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक किंवा इतर प्रभावी व्यवस्था करावी, तसेच आवश्यक त्या ठिकाणी प्रकाशयोजना, इशारा फलक, स्पीड कंट्रोल उपाय आणि वाहतूक नियंत्रणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीने या प्रश्नाकडे अत्यंत गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

थोडे नवीन जरा जुने