!-- afp header code starts here --> महापालिका प्रशासकीय भवन अन्‌ ‘अजित सृष्टी’चे एकत्रित लोकार्पण!

महापालिका प्रशासकीय भवन अन्‌ ‘अजित सृष्टी’चे एकत्रित लोकार्पण!


- प्रशासकीय भवनाच्या कामात ‘अजित सृष्टी’चा समावेश करा

- भाजपा आमदार महेश लांडगे यांची महापालिका आयुक्तांना सूचना 

पिंपरी-चिंचवड :  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या टप्प्यातील कामामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या 'अजितसृष्टी' या प्रकल्पाचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. नवीन प्रशासकीय भवन आणि 'अजितसृष्टी' या दोन्ही प्रकल्पांचे काम पूर्ण करून त्यांचे एकत्रित लोकार्पण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना यासंदर्भात एक सविस्तर पत्र दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. याच इमारतीच्या आवारात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याची स्मृती जपणारी 'अजित सृष्टी' उभारण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. मात्र, आता प्रशासकीय भवनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा प्रसिद्ध करताना त्यात 'अजित सृष्टी' प्रकल्पाचाही समावेश करणे अपेक्षित असल्याचे आमदार लांडगे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारातच हा प्रकल्प उभारला जाणार असल्याने दोन्ही कामे एकाच वेळी पूर्ण होणे आवश्यक आहे.

लोकनेते अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र आणि विशेषतः पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात दिलेले योगदान बहुमोल आहे. शहराच्या विकासाचा हा इतिहास आणि अजितदादांच्या कार्याचा गौरव भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'अजितसृष्टी' हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, अशी भावना आमदार लांडगे यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची मागणी

'अजितसृष्टी'चे काम नवीन प्रशासकीय इमारतीच्या मूळ प्रकल्पामध्ये समाविष्ट करून, त्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय, तांत्रिक आणि आर्थिक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली आहे. नवीन प्रशासकीय इमारत ही शहराच्या भविष्यातील विकासाचे प्रतीक असणार आहे. त्यामुळे 'अजितसृष्टी'चे काम प्राधान्याने पूर्ण करून सर्वसाधारण सभेच्या निर्णयाला योग्य न्याय द्यावा आणि दोन्ही प्रकल्प एकाच वेळी शहरवासीयांच्या सेवेत दाखल करावेत, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया : 

"पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासात लोकनेते अजितदादा पवार यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्याचा गौरव आणि शहराच्या विकासाची वाटचाल पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नव्या प्रशासकीय इमारतीसोबतच 'अजितसृष्टी'चे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. या दोन्ही वास्तूंचे एकत्रित लोकार्पण व्हावे, ही तमाम पिंपरी-चिंचवडकरांची लोकभावना आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी पाठपुरावा करून हा प्रकल्प लवकरात लवकर शहरवासीयांच्या सेवेत रुजू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

थोडे नवीन जरा जुने