!-- afp header code starts here --> साहित्यिक संवादातून नवोदित लेखकांना नवी दिशा

साहित्यिक संवादातून नवोदित लेखकांना नवी दिशा

 

प्रश्नोत्तराच्या सत्राने जिंकली उपस्थितांची मने

पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) : समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने तसेच संस्कार भारती, पश्चिम प्रांत, पिंपरी-चिंचवड समिती यांच्या सहसंयोजनातून दत्तोपंत मस्कर सभागृह निगडी येथे आयोजित करण्यात आलेला ‘साहित्यिक संवाद’ हा अभिनव उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. साहित्यिक, लेखक, वाचक, अभ्यासक आणि साहित्यप्रेमी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.

"सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक" या ब्रीदवाक्याला साजेशा वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. योगेश सोमण यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आपल्या मनोगतात श्री. सोमण यांनी साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असल्याचे सांगत, साहित्यिकांनी समाजातील घडामोडींचे संवेदनशीलपणे निरीक्षण करून लेखन करावे, असे आवाहन केले. नवोदित लेखकांसाठी सातत्याने वाचन, चिंतन आणि लेखन यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमातील प्रश्नोत्तराचा तास विशेष लक्षवेधी ठरला. उपस्थित लेखक, कवी आणि वाचकांनी विविध साहित्यिक विषयांवर प्रश्न विचारले. श्री. सोमण यांनी प्रत्येक प्रश्नाला अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक उत्तरे देत नवोदित लेखकांना लेखनातील बारकावे समजावून सांगितले. त्यामुळे हे सत्र उपस्थितांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरले.


यावेळी बोलताना श्री. सोमण यांनी, "नवीन लेखक घडविण्यासाठी आणि उत्तम वाचक निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम, कार्यशाळा व साहित्यिक संवाद आयोजित करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अशा साहित्यिक संवादांचे आयोजन करण्यात येणार असून साहित्याची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत," असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमामुळे साहित्यिक, वाचक आणि विचारवंत यांच्यातील संवादाचा सेतू अधिक मजबूत झाला. साहित्य क्षेत्रातील नव्या पिढीला दिशा देणारा आणि साहित्यविषयक विचारांची देवाणघेवाण घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थितांच्या स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

समरसता साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी, साहित्यप्रेमी आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानले.



थोडे नवीन जरा जुने