!-- afp header code starts here --> पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती केल्यास आंदोलन करू – माकपचे गणेश दराडे

पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती केल्यास आंदोलन करू – माकपचे गणेश दराडे

 


महावितरणच्या स्मार्ट (प्रीपेड) मीटर सक्तीविरोधात तीव्र जनआक्रोश – सतीश नायर

कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत पदाधकारी संतप्त

PCMC 

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्रातील नागपूर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पालघर तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात महावितरणकडून स्मार्ट (प्रीपेड) वीज मीटर बसविण्याच्या कथित सक्तीविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचा दावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे.पक्षाच्या बैठकीत बोलताना सतीश नायर यांनी सांगितले की, वाढीव वीजबिले, स्मार्ट मीटर बसविण्याची कथित सक्ती आणि महावितरणच्या खासगीकरणाच्या भीतीमुळे विविध ग्राहक संघटना व राजकीय पक्ष आंदोलनाच्या भूमिकेत गेले आहेत.

महावितरणकडून ग्राहकांना "४८ तासांत मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यात येईल" असे संदेश पाठवून पूर्वसंमती न घेता मीटर बसविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काही ग्राहकांची वीजबिले मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

बैठकीत असा दावा करण्यात आला की, स्मार्ट प्रीपेड प्रणालीमुळे मोबाईल रिचार्जप्रमाणे वारंवार रिचार्ज करण्याची वेळ येईल आणि भविष्यात वीजदर वाढण्याची शक्यता असल्याची भीती नागरिकांमध्ये आहे. तसेच या योजनेवरील हजारो कोटी रुपयांचा खर्च अखेरीस ग्राहकांच्या वीजदरातून वसूल केला जाईल, अशीही भीती विविध संघटनांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

मीटर बसविण्याचे काम अदानी, जीनस यांसारख्या खाजगी कंपन्यांना देण्यात आल्यामुळे महावितरणच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तसेच प्रीपेड रिचार्ज संपल्यानंतर वीजपुरवठा खंडित होईल, या भीतीमुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये अस्वस्थता असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

माकपचे पिंपरी-चिंचवड शहर सचिव सचिन देसाई यांनी सांगितले की, नागपूरमध्ये 'स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी नागरिक संघर्ष समिती'ने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून ही मोहीम तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे. कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे येथेही विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून सह्यांच्या मोहिमा व निषेध आंदोलने सुरू आहेत. काही ठिकाणी ग्राहकांची संमती न घेता प्रक्रिया राबविल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याचाही दावा त्यांनी केला.

पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागांत टप्प्याटप्प्याने स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

बैठकीत उत्तर प्रदेश सरकारने स्मार्ट प्रीपेड मीटरबाबतची सक्ती रद्द केली आहे, प्रीपेड मीटर  पुन्हा स्थानांतरित करून परत पोस्टपेड केले आहेत. योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेल्या निर्णयाचा उल्लेख करून महाराष्ट्र सरकारनेही स्मार्ट प्रीपेड मीटर संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी माकपचे शहर नेते राज्य समिती सदस्य गणेश दराडे यांनी इशारा देत सांगितले की, "पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याची सक्ती केल्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."

आकुर्डी येथे झालेल्या बैठकीस सतीश नायर, क्रांतीकुमार कडुलकर, ॲड. अमिन शेख, सचिन देसाई, अविनाश लाटकर, रिया सागवेकर, अपर्णा दराडे, पोनपण, विश्वनाथन आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने