पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) : पिंपरी चिंचवड शहर ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला २३ वा वर्धापन दिन सोहळा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. शहरातील महासंघाशी संलग्न असलेल्या १७८ ज्येष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी, सभासद आणि ज्येष्ठ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात चहापानाने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन व सर्वसाधारण सभा पार पडली. संगीत सरिता यांच्या मराठी व हिंदी गीतांच्या सुमधुर कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व मनोगते यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, शत्रुघ्न बापू काटे, भाऊसाहेब भोईर तसेच अनेक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती वृशाली मरळ, कार्याध्यक्ष विजय शिंगाडकर, सचिव ईश्वरलाल चौधरी, सहसचिव एकनाथ धुळे तसेच विविध विभागांचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. विभागीय गट उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले श्री. उत्तरेश्वर तोडकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. अनेक ज्येष्ठांनी आपल्या आवडत्या गीतांचे सादरीकरण करून आनंद व्यक्त केला. संगीताच्या तालावर नाचत, फेर धरत आणि एकमेकांशी स्नेहसंवाद साधत ज्येष्ठांनी आनंदाचा अक्षरशः वर्षाव केला. वातावरणात उत्साह, आपुलकी आणि जिव्हाळ्याचे दर्शन घडले.
भोजनोत्तर कार्यक्रमानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव घेऊन या संस्मरणीय सोहळ्याची सांगता करण्यात आली.
विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी सातत्याने कार्य करणारा पिंपरी-चिंचवड शहर ज्येष्ठ नागरिक महासंघ हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अग्रगण्य संस्थांपैकी एक मानला जातो. ज्येष्ठांच्या आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध समस्यांबाबत संवेदनशीलपणे काम करणाऱ्या या महासंघाचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
