!-- afp header code starts here --> पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

 


NQAS सर्वेक्षणात पुणे जिल्हा परिषदेची खेड तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रे राज्यात अव्वल 

आळंदी (अर्जुन मेदनकर) : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्रा मार्फत (NQAS) घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात पुणे जिल्हा परिषदेची आरोग्य उपकेंद्रे गुणवत्ता व दर्जात महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आली आहेत. यात खेड तालुक्यातील उपकेंद्रांचा समावेश झाल्याने खेड तालुक्याचे ही नावलौकिकात वाढ झाली आहे.

       पुणे जिल्हा परिषदेच्या  टाकळकरवाडी ( तालुका खेड ) प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास ९४.८ टक्के तर रिहे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास ९३.२९ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. या गुणवत्तेच्या आधारे ही दोन्ही उपकेंद्रे महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरली आहेत. 

     पुणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पुणे  जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे हे यश आहे. या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे जिल्हा परिषदे तर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. 

     आयुष्मान आरोग्य मंदिर राजगुरुनगर अंतर्गत असलेले  उपकेंद्र टाकळकरवाडी यांचे १४ मे २०२६ रोजी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक कार्यक्रमा अंतर्गत मूल्यांकन झाले. सदर मूल्यांकन राष्ट्रीय स्तरावरील परीक्षक यांनी केले.

     आयुष्मान आरोग्य मंदिर टाकळकरवाडी येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रतीक्षा येडले, आरोग्य सेविका श्रीम.अर्चना मांजरे, आरोग्य सेवक प्रतिक गवारी, रोहन कोळपकर, आरोग्य सहाय्यक महेश दहिवळ, आरोग्य सहाय्यिका श्रीम. माधुरी थिगळे तसेच उपकेंद्रातील सर्व आशा स्वयंसेविका व इतर कर्मचारी यांनी मूल्यांकन कार्यक्रम पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

या मूल्यांकन कार्यक्रमा साठी ग्रामपंचायत कार्यालय टाकळकरवाडी, सरपंच, सर्व सदस्य यांचेही मोलाचे सहकार्य झाले. १५ जून २०२६ रोजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत सदर मूल्यांकनाचा अहवाल मिळाला असून या मध्ये आयुष्मान आरोग्य मंदिर टाकळकरवाडी यांस ९४.८ टक्के  गुण प्राप्त होऊन त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या मूल्यांकनासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ विलास माने यांचे विशेष सहकार्य लाभले. वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी मार्गदर्शक म्हणून महत्वाची भूमिका बजावली.

तालुका व जिल्ह्यातील इतर आरोग्य संस्थां साठी टाकळकरवाडी आरोग्य मंदिर आदर्शवत ठरले आहे. या भागातील नागरिकांनी देखील केंद्रातील सर्व संबंधित घटकांचे अभिनंदन केले.

थोडे नवीन जरा जुने