!-- afp header code starts here --> सोसायट्यांच्या प्रश्नांवर सर्वसाधारण सभेत मौन ; सोसायटीधारकांमध्ये संताप

सोसायट्यांच्या प्रश्नांवर सर्वसाधारण सभेत मौन ; सोसायटीधारकांमध्ये संताप

 


ओला कचरा व्यवस्थापन व सोसायट्याच्या अमेनिटीजवर टॅक्ससारख्या महत्त्वाच्या विषयांवर नगरसेवक गप्प का ?

“आपली लढाई आपल्यालाच लढायची” भावना तीव्र

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील सोसायट्यांशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर एकाही सन्माननीय नगरसेवकाने आवाज उठवला नसल्याने सोसायटीधारकांमध्ये  तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2026 नुसार महानगरपालिकेकडून येत्या १ जुलैपासून सोसायट्यांनी स्वतःच्या परिसरातच ओला कचऱ्यावर  प्रक्रिया करून जिरवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय, सोसायट्यांच्या अमेनिटीजवर लावण्यात आलेल्या करामुळे (टॅक्स) सोसायटीधारकांमध्ये  अस्वस्थता निर्माण झाली आहे.या दोन्ही विषयांचा थेट परिणाम हजारो नागरिकांवर होणार असतानाही सर्वसाधारण सभेत या मुद्द्यांवर कोणतीही ठोस चर्चा झाली नाही.

विशेष म्हणजे, ओला कचरा व्यवस्थापनाची सक्ती आणि वाढता आर्थिक भार यामुळे अनेक सोसायट्या संभ्रमावस्थेत असून, प्रशासनाने यासंदर्भात स्पष्ट धोरण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर सोसायटीधारकांनी  आता स्वतः संघटित होऊन आपल्या हक्कासाठी लढा उभारण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत असून,“गड्यांनो, आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे”,असा सूर जनमानसात उमटताना दिसत आहे.

प्रतिक्रिया 

नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडणे अपेक्षित असताना, सभागृहातील शांततेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. “ज्यांना आपण निवडून दिले, त्यांनाच आपल्या समस्यांबाबत काहीही देणंघेणं दिसत नाही,” अशा भावना सोसायटीधारकांकडून व्यक्त होत आहेत.

संजीवन सांगळे 

अध्यक्ष - चिखली- मोशी -पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन

थोडे नवीन जरा जुने