- भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेमुळे समस्या निकालात
- महावितरण प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद, नागरिकांना दिलासा
पिंपरी चिंचवड : भोसरी विधानसभा मतदारसंघातील स्वामी समर्थ फ्लोअर मिल, लांडगेनगर परिसरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून सततच्या वीज समस्येला सामोरे जावे लागत होते. वारंवार खंडित होणारा व कमी दाबाचा वीजपुरवठा यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडे तक्रार केली होती.
नागरिकांच्या या समस्येची आमदार महेश लांडगे यांनी तात्काळ दखल घेत महावितरण प्रशासनाशी समन्वय साधत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार परिसरात २०० मीटर एल.टी. (LT) केबल टाकण्यात आली तसेच नवीन ४-वे फिडर पिलर बसविण्यात आला. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत झाला असून, वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्येवर मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात वाढते औद्योगिकीकरण आणि झपाट्याने विस्तारत असलेली नागरी वस्ती लक्षात घेऊन वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आमदार महेश लांडगे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून महावितरणच्या भोसरी विभागाचे विभाजन करण्यात आले असून, त्यामुळे वीज व्यवस्थापन अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.
याशिवाय इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम (IPDS) अंतर्गत मतदारसंघातील विद्युत पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. यामध्ये मोशी सफारी पार्क अतिउच्चदाब (EHV) उपकेंद्र, चऱ्होली अतिउच्चदाब (EHV) उपकेंद्र, भोसरी गावठाण येथील नवीन स्विचिंग उपकेंद्र, ओव्हरहेड वीजवाहिन्यांचे भूमिगतकरण, तळवडे येथील देवी इंद्रायणी स्विचिंग उपकेंद्रातून स्वतंत्र फिडर बे तसेच नवीन उपविभाग व शाखा कार्यालय या कामांना मंजुरी मिळाली असून, त्यासाठी आवश्यक निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले, "नागरिकांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा मिळणे ही आमची प्राथमिकता आहे. स्थानिक पातळीवरील समस्या तातडीने सोडविण्याबरोबरच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन वीज पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठीही आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तसेच, सदर काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले. "निरंतर विश्वास पिंपरी-चिंचवडकरांचा, संकल्प शहराच्या शाश्वत विकासाचा..!" या ध्येयाने भोसरी विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा वेग कायम असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रतिक्रिया :
"भोसरी विधानसभा मतदारसंघातील वाढती वीज मागणी लक्षात घेऊन केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर भर न देता, विद्युत वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधांवर सातत्याने गुंतवणूक केली जात आहे. नवीन एल.टी. केबल, फिडर पिलर, उपकेंद्रे, फिडर क्षमता वाढ आणि महावितरणच्या यंत्रणेचे बळकटीकरण यांसारख्या कामांमुळे भविष्यातील वीज गरजा सक्षमपणे पूर्ण होतील. त्या अनुशंगाने मतदार संघात ठिकठिकाणी प्रभावी नियोजन करीत आहोत.
— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.


