पिंपरी चिंचवड : मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ९ नागरिकांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने करण्यात येत असून, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात आर्थिक मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
याअंतर्गत, मृत सन्नी माने यांच्या कायदेशीर वारसांना एकूण १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. त्यांच्या पत्नी मनीषा सन्नी माने यांच्या खात्यात ५ लाख रुपये, तर आई फौजिया अझीम माने यांच्या खात्यात ५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
तसेच, मृत राहुल गायकवाड यांच्या कायदेशीर वारसांनाही एकूण १० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. त्यांच्या पत्नी भाग्यश्री राहुल गायकवाड यांच्या खात्यात ५ लाख रुपये, तर आई सरस्वती गायकवाड आणि वडील अर्जुन गायकवाड यांच्या खात्यात प्रत्येकी २ लाख ५० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
याशिवाय, मृत वामन कसबे यांच्या कायदेशीर वारस असलेल्या त्यांच्या पत्नी सुमन वामन कसबे यांच्या खात्यात १० लाख रुपयांची आर्थिक मदत थेट जमा करण्यात आली आहे. यापूर्वी, मृत अक्षय सावंत यांच्या कायदेशीर वारसांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यातही नियमानुसार १० लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे.
दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भावेश वाणी, सुनील कोरके, महेश कुंभार, नागेश गायकवाड आणि रणजीत पाटील यांच्या कायदेशीर वारसांच्या कागदपत्रांची पडताळणी व आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही नियमानुसार आर्थिक मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
---------------------------------------------
"मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना जाहीर केलेली आर्थिक मदत शक्य तितक्या लवकर त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्राधान्याने कार्यरत आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. उर्वरित सर्व पात्र वारसांनाही कोणताही विलंब न लावता नियमानुसार आर्थिक मदत वितरित करण्यात येईल."
– डॉ. विजय सूर्यवंशी
आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
