पिंपरी चिंचवड – कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालक संघर्ष महासंघ तसेच सहयोगी संघटनांच्या वतीने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कष्टकरी, कामगार, रिक्षाचालक आणि फेरीवाला बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, राज्याच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे होते. सिंचन, पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी, सहकार आणि शहरी विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी दूरदृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. प्रशासनातील कार्यक्षमता, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि जनतेच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वांसाठी प्रेरणादायी होती.
कामगार, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि विकासाच्या माध्यमातून राज्याला पुढे नेण्याची त्यांची भूमिका कायम स्मरणात राहील. त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळत राहील, असे मत काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
यावेळी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
.png)