५२६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा, ४ लाख ४५ हजार ६२० मालमत्ताधारकांनी घेतला कर सवलतींचा लाभ....
महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी करदात्यांचे मानले आभार
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये कर वसुलीचा उच्चांकी 'माईलस्टोन' गाठला आहे. अवघ्या तीन महिन्यांत ५२६ कोटी १४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे. ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता धारकांपैकी पहिल्या तिमाहीमध्येच ५९.८४ टक्के मालमत्ता धारकांनी कराचा भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. याबद्दल सर्व करदात्यांचे महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी आभार मानले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात सध्या निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व इतर मिळून सुमारे ७ लाख ४४ हजार ६३० मालमत्तांची नोंद असून त्यापैकी ४ लाख ४५ हजार ६२० मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. पहिल्या तिमाहित कर भरणा-या नागरिकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. नागरिकांनी मालमत्ताकर भरण्यासाठी करसंकलन विभागाने विविध उपाययोजना राबविल्या. त्याच्या माध्यमातून करदात्यांपर्यंत मालमत्ताकरावरील सवलतीबाबत विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली. यामुळे नागरिकांना सवलतीबाबत माहिती होऊन नागरिकांनी पहिल्या तिमाहीमध्येच आपला मालमत्ताकर भरण्यासाठी प्राधान्य दिले आहे. सवलतीबाबत जनजागृती झाल्याने परिणामी, सन २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण मालमत्ताधारकांपैकी ४ लाख ४५ हजार ६२० मालमत्ताधारकांनी कर भरला असून त्यापैकी ३ लाख ४७ हजार ५६४ मालमत्ता धारकांनी ऑनलाइन स्वरूपात कर भरून सवलतींचा लाभ घेतला आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पालिकेने राबविलेल्या महिला बचत गटामार्फत मालमत्ताधारकांना घरपाेच बिलाचे वाटप केले, त्यामुळे नागरिकांनी ३० जूनपर्यंत महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक कराचा भरणा केल्याची माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.
.....
असा आला मालमत्ता कर
ऑनलाइन - ४०७ कोटी ८९ लाख
रोख - २१ कोटी ४७ लाख
धनादेशाद्वारे - १६ काेटी २४ लाख
डीडी - १५ काेटी ७५ लाख
विविध अँप- १० काेटी ४५ लाख
