मुंबई (वर्षा चव्हाण) : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. RailOne App वरून बुक केलेल्या अनारक्षित (Unreserved/UTS) डिजिटल तिकिटांबाबत रेल्वेने नियम स्पष्ट केले आहेत.
प्रवाशांनी लक्षात ठेवावे की, RailOne App वर काढलेल्या तिकिटाचा WhatsApp वर पाठवलेला फोटो, स्क्रीनशॉट किंवा इतर माध्यमातून शेअर केलेली प्रत प्रवासासाठी वैध मानली जाणार नाही. तिकीट तपासणीच्या वेळी प्रवाशाने RailOne App मध्ये उपलब्ध असलेले मूळ डिजिटल तिकीट दाखवणे आवश्यक आहे.
रेल्वेच्या नियमानुसार, अनारक्षित डिजिटल तिकीट ज्या मोबाईल डिव्हाइसवर बुक करण्यात आले आहे, त्याच मोबाईलवर वैध राहील. त्यामुळे प्रवास करताना तिकीट बुक केलेला मोबाईल सोबत ठेवणे गरजेचे आहे.
तसेच प्रवाशांनी ओळख पटवण्यासाठी फोटोयुक्त ओळखपत्र सोबत ठेवावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, हा नियम सर्व प्रकारच्या रेल्वे तिकिटांसाठी नसून RailOne App मधून बुक केलेल्या अनारक्षित डिजिटल तिकिटांसाठी लागू आहे. त्यामुळे प्रवाशांनी आरक्षित ई-तिकिटे आणि अनारक्षित डिजिटल तिकिटांमधील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.
प्रवासात अडचण टाळण्यासाठी प्रवाशांनी WhatsApp किंवा स्क्रीनशॉटवर अवलंबून न राहता, RailOne App मधील मूळ तिकीटच वापरावे.
