!-- afp header code starts here --> एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त जुन्नर आगारात वृक्षारोपण

एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त जुन्नर आगारात वृक्षारोपण



जुन्नर (रफिक शेख) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यभर राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण अभियानांतर्गत जुन्नर आगारात उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत "एक झाड लावून हरित भविष्याचा संकल्प करूया" या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

एसटी महामंडळाच्या वतीने १९ जुलै रोजी राज्यातील बसस्थानके, आगार आणि विभागीय कार्यालय परिसरातील सुमारे एक हजार ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. हरित महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात जुन्नर आगारानेही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

जुन्नर आगारातील कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती कमलताई शेळकंदे, जुन्नरचे नगरसेवक अनिल रोकडे, समाजसेवक विश्वास बाबा ढोबळे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक उत्तम लांडे, वाहतूक नियंत्रक अमित खेडकर, वाहतूक निरीक्षक मारुती साबळे, गणेश गाढवे तसेच परिसरातील पोलीस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन उपस्थितांनी केले. एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचला असून, हरित महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

थोडे नवीन जरा जुने