!-- afp header code starts here --> दुःखाच्या क्षणी राजकारण नव्हे, तर माणुसकीची साथ द्या...!

दुःखाच्या क्षणी राजकारण नव्हे, तर माणुसकीची साथ द्या...!

 


पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या अपघातात अनेक कर्मचारी गंभीर जखमी झाले, तर काही कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 

गेल्या अनेक दिवसांपासून बचाव पथके, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस आणि प्रशासन जीवाची बाजी लावून रेस्क्यू ऑपरेशन राबवत होते. प्रत्येक अडकलेल्या कर्मचाऱ्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. मात्र नियतीपुढे काही प्रयत्न अपुरे पडले आणि काही बांधवांना आपण कायमचे गमावले. ही वेदना संपूर्ण शहराची आहे.

या काळात शहरातील दैनंदिन कचरा संकलन मात्र थांबले नाही. घरोघरी कचरा गोळा करण्याचे काम नियमित सुरू होते. परंतु मोशी कचरा डेपोमध्ये बचावकार्य सुरू असल्यामुळे कचऱ्याच्या कॉम्पॅक्टर गाड्यांना डेपोमध्ये प्रवेश देता येत नव्हता. त्यामुळे विविध भागांतील कचरा स्थानिक संकलन केंद्रांवर तात्पुरता साठवून ठेवावा लागला. परिणामी काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. ही परिस्थिती कायमस्वरूपी नसून, बचावकार्य संपल्यानंतर ती टप्प्याटप्प्याने पूर्ववत केली जात आहे.

अशा वेळी आपण सर्वांनी संयम, समजूतदारपणा आणि सामाजिक जबाबदारी दाखवणे आवश्यक आहे. आपल्या शहरासाठी अहोरात्र काम करणारे कर्मचारी संकटात असताना त्यांच्या वेदनेची जाणीव ठेवणे हीच खरी माणुसकी आहे.

काही गोष्टी तात्पुरत्या असतात, पण माणुसकी कायमची असते. प्रत्येक समस्येचे राजकारण करून, फोटो काढून किंवा सोशल मीडियावर स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा दुःखाच्या क्षणी सहकार्याची भूमिका घेणे हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे.

चला... टीका करण्याआधी परिस्थिती समजून घेऊया. अफवा पसरवण्याऐवजी सत्य जाणून घेऊया. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आपल्या कर्तव्यावर असताना प्राण गमावलेल्या कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहूया.

 दुःखात सहभागी होऊया... संयम राखूया... माणुसकी जपूया... 

 -शिवानंद चौगुले

#मोशी_दुर्घटना #पिंपरी_चिंचवड #माणुसकी #संयम #सहकार्य #स्वच्छताकर्मचारी_आमचे_हिरो #श्रद्धांजली

थोडे नवीन जरा जुने