अरुण पवार यांनी विविध शाळा, महाविद्यालयात केले एक हजार वृक्षांचे रोपण; विद्यार्थी, शिक्षकांना संविधानाची प्रत भेट

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाचा मानाचा 'श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र राज्यस्तरीय पुरस्कार' तथा 'समाजभूषण पुरस्कार' प्राप्त अरुण पवार यांच्या प्रेरणेतून व मराठवाडा जनविकास संघाच्या पुढाकाराने सहा फुटाहून अधिक उंचीच्या १०५० रोपांचे विविध शाळा, महाविद्यालयात वृक्षारोपण व संविधानाच्या प्रतीचे वाटप करण्यात आले. 

            यामध्ये श्री लक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्था (हासेगाव शि., ता. कळंब, जि. धाराशिव) येथे संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ५०० झाडांचे शास्त्रोक्त पद्धतीने रोपण करण्यात आले. परिसरामध्ये हरित पट्टा निर्माण करून या सर्व झाडांचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. भैरवनाथ हायस्कूल (धारूर, जि. धाराशिव) परिसरात पर्यावरण जनजागृतीसाठी २५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. जनता शिक्षण संस्था संचलित श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, औंध (पुणे), अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी ५० झाडांचे रोपण करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली. यावेळी जनता शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष महेश आगम, पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड,  कैलास गायकवाड, संस्थेचे सदस्य शहाजी रानवडे, ॲड. तानाजी चोंदे उपस्थित होते. 

         रामेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ (सोनपेठ, जि. परभणी) संस्थेच्या परिसरात १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. अ राय ऑफ होप चॅरिटेबल ट्रस्ट (वाकड, पुणे) येथे संस्थेचे अध्यक्ष अभियंता संजय कुमार यांच्या पुढाकाराने बोरकरवाडी, रिहे व वाकड परिसरात १०० वृक्षांचे यशस्वी रोपण व वाटप करण्यात आले. वेदांत साधना वारकरी गुरुकुल (बोरकरमळा, रिहे, ता. मुळशी,) परिसरात गुरुकुलचे संस्थापक ह.भ.प. निवृत्ती महाराज बोरकर (शास्त्री) यांच्या पुढाकारने ५० झाडांचे वृक्षारोपण व वृक्षदान करण्यात आले.

        यावेळी कॅप्टन युवराज माने, ह.भ.प. शेखर महाराज जांभूळकर, मंदाताई शेळके, बाबाजी शेळके, रिहे गावचे सरपंच धनाजी बोडके, राहुल पवळे, गोपाळ शिंदे, विजय गायकवाड, कैलास जाधव, शरदजी भोते, महादेव भोईर, तात्यासाहेब देवकर अभियंता संजय कुमार, दत्तात्रय बंडगर, केरबा लोकरे, अण्णासाहेब गरड, विजयकुमार कुलकर्णी, युवराज सूर्यवंशी, मल्हारी कसबे, व्यंकट बंडगर, संभाजी कदम, रामराजा देडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

         विविध जिल्ह्यांत एकाच वेळी राबविलेल्या या पर्यावरणपूरक व सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या वृक्षारोपणात विविध प्रजातींच्या देशी, औषधी, शोभिवंत व फळझाडांचा समावेश होता. वड, पिंपळ, कडुलिंब, उंबर, चिंच, आवळा, बेल, अर्जुन, गुलमोहर, पळस, बहावा, कदंब, बकुळ, करंज, गुलछडी, जास्वंद, मोगरा, जाई, जुई, सोनचाफा, चाफा, पारिजात, कण्हेर, बोगनवेल, अबोली, झेंडू, गुलाब, निशिगंध, शेवंती, सदाफुली, स्वस्तिक, तगर, कृष्णकमळ, मधुमालती, रानजाई, अनंत, कमळ, हजारमोगरा, रामफळ, जांभूळ, डाळिंब, चिक्कू, पपई, सीताफळ, बोर, मोसंबी, संत्री, अंजीर, काजू, जर्दाळू, तुती, खजूर, सुपारी, सफरचंद, फणस, नारळ, कोकम, विलायची मिरी आदी वनस्पतींचा समावेश आहे. 

------------------------------------------

पर्यावरण संवर्धन आणि संविधान साक्षरता हीच खरी राष्ट्रनिष्ठा आहे. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी झाडांची लागवड करणे आणि भावी पिढीमध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत भारतीय संविधानाची प्रत भेट देणे, हा दुहेरी आनंद देणारा उपक्रम आहे. ही सर्व झाडे केवळ लावून न थांबता, स्थानिक संस्था व नागरिकांच्या सहभागातून ती शंभर टक्के जगवून त्यांचे संवर्धन केले जाईल."

          - अरुण पवार (संस्थापक-अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ)

थोडे नवीन जरा जुने