!-- afp header code starts here --> भक्तिरसात न्हाऊन निघाला भजन सादरीकरण महोत्सव; २१ भजनी मंडळांच्या सहभागाने चिखलीत मंगलमय वातावरण

भक्तिरसात न्हाऊन निघाला भजन सादरीकरण महोत्सव; २१ भजनी मंडळांच्या सहभागाने चिखलीत मंगलमय वातावरण

 


प्रतिनिधी : शिवानंद चौगुले | महाराष्ट्र जनभूमी

चिखली : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ अंतर्गत संस्कृती संवर्धन व विकास महासंघ – चिखली विभाग आयोजित आषाढ मास व गुरुपौर्णिमा निमित्त भजन सादरीकरण महोत्सव – २०२६ अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असतानाही भक्तीचा उत्साह कुठेही कमी झाला नाही. तब्बल २१ भजनी मंडळांनी सहभाग नोंदवत भजन, अभंग, गवळणी आणि हरिनामाच्या गजराने परिसर भक्तिरसात चिंब भिजवला.

कार्यक्रमाची सुरुवात नगरसेवक निलेश नेवाळे, श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायणराव बहिरवाडे, संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचे सचिव शिवानंद चौगुले आणि अर्चना सोनार यांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर पंचपदीने भजन सादरीकरणास प्रारंभ झाला.

दिवसभर विविध भजनी मंडळांनी आपल्या सुरेल गायनातून उपस्थितांना भक्तिरसात तल्लीन केले. प्रत्येक मंडळाने सादर केलेले अभंग, गवळणी आणि पारंपरिक भजने यांना उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त दाद दिली. विशेष आकर्षण ठरलेले श्री गजानन बाल भजनी मंडळाचे सादरीकरण उपस्थितांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले. तसेच अर्चना सोनार यांच्या मार्गदर्शनाखालील ज्ञानाई व आई विद्यावासिनी भजनी मंडळाचे गोल रिंगण आणि सुंदरकांड सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी पारंपरिक पद्धतीने झालेले रिंगण हे सर्वांसाठी अविस्मरणीय ठरले. टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा अखंड जयघोष होत भक्तिभावाचे विलक्षण दर्शन घडले. त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी नगरसेविका अनुराधा गोरखे, रिटा सानप, सरिता नेवाळे, मनीषा बर्गे, सचिन सानप, हरिनारायण शेळके तसेच प्रख्यात साहित्यिक डॉ. अजित जगताप यांची विशेष उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी आयोजकांना शुभेच्छा देत अशा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मार्गदर्शन करताना डॉ. अजित जगताप म्हणाले, "नारीने एक सकारात्मक संकल्प केला तर ती केवळ एक कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण समाज आणि राष्ट्र घडवू शकते. नारीशक्तीत अपार ऊर्जा असून ती राष्ट्रनिर्मितीसाठी उपयोगात आणणे ही काळाची गरज आहे." त्यांच्या या प्रेरणादायी विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्कृती संवर्धन भजन महासंघ – चिखली विभाग, श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, संस्कृती संवर्धन व विकास महासंघ, सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक, भजनी मंडळे, देणगीदार आणि भाविकांनी मोलाचे योगदान दिले. विशेषतः मुसळधार पावसातही सर्वांनी दाखविलेली शिस्त, समर्पण आणि भक्तीभाव हा महोत्सवाच्या यशाचा मुख्य आधार ठरला.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचे सचिव शिवानंद चौगुले यांनी उपस्थित मान्यवर, भजनी मंडळे, स्वयंसेवक, देणगीदार आणि सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच भविष्यातही अशाच भक्तिमय आणि संस्कारक्षम उपक्रमांद्वारे समाजात भक्ती, संस्कृती आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

थोडे नवीन जरा जुने