!-- afp header code starts here --> कल्याण - माळशेज घाट महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश

कल्याण - माळशेज घाट महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश



जुन्नर (रफिक शेख) : कल्याण - माळशेज घाट राष्ट्रीय महामार्गावरील कंरजाळे गावाजवळील रस्ता खचल्यामुळे वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील कंरजाळे गावाजवळील कि.मी. ९९/५०० ते ९९/६०० या दरम्यानचा मार्ग तात्पुरता बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.


जुन्नर - आंबेगाव उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता खचला असून, त्याचा वाहतुकीच्या सुरक्षिततेवर विपरीत परिणाम झाला आहे. पावसाळ्यात दरड कोसळणे किंवा इतर अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन अपघात टाळण्यासाठी तातडीने वाहतूक नियंत्रणाची आवश्यकता निर्माण झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.


जुन्नर पोलीस ठाण्याच्या अहवालानुसार, कंरजाळे गावाजवळील या भागातून वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. मात्र रस्ता खचल्याने आणि खड्डा पडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


आदेशानुसार, आळेफाटा–नारायणगाव–खेड–चाकण एमआयडीसी–लोणीकंद चौफुला–मुंबई या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. हा आदेश २५ जुलै २०२६ रोजी मध्यरात्रीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत संबंधित मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहणार आहे. प्रशासनाने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, तसेच सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.


थोडे नवीन जरा जुने