वातावरणातील बदलामुळे तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता

 

स्वाईन फ्लूपासून बचावासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे वैद्यकीय विभागाचे आवाहन 

पिंपरी चिंचवड : वातावरणातील बदलामुळे सध्या तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता असून, त्याचबरोबर स्वाईन फ्लूसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी किंवा श्वसनाशी संबंधित लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  

स्वाईन फ्लू हा श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असून सर्दी, खोकला, घसादुखी, ताप तसेच श्वसनाशी संबंधित विविध लक्षणे आढळू शकतात. वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.  

१ जानेवारी २०२६ पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात इन्फ्लुएंझा H1N1 बाधित १९ रुग्ण आढळून आले आहेत. योग्य वेळी घेतलेला वैद्यकीय सल्ला व उपचारांमुळे या कालावधीत एकही जीवितहानी झालेली नाही. तरी नागरिकांनी आजाराच्या लक्षणांबाबत अनावश्यक भीती न बाळगता वेळे नजिकच्या मनपा दवाखाना किंवा रुग्णालयातील वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्वाचे आहे, जेणेकरून आजाराचे प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य होईल. 

स्वाईन फ्लूपासून बचावासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी  

महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे: 

- स्वाईन फ्लूच्या विषाणूबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. 

- सर्दी, खोकला, घसादुखी, ताप आदी लक्षणे आढळल्यास तातडीने नजीकच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. 

- वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. 

- पोषक व संतुलित आहार घ्यावा. 

- धूम्रपान टाळावे. 

- शरीराला पुरेशी झोप व विश्रांती द्यावी. 

- शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी पुरेसे पाणी प्यावे. 

- आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री तसेच हिरव्या पालेभाज्यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा. 

- गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे. 

- आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा. 

- खोकताना किंवा शिंकताना नाक व तोंड रुमालाने अथवा टिश्यूने झाकावे. त्यानंतर हातांची स्वच्छता राखावी

थोडे नवीन जरा जुने