MGID Header Code
Code End

आळंदीत दिव्यांगांना मिळणार मॉड्युलर पाय मोफत ; नाव नोंदणीचे आवाहन

 

आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे 23 ऑक्टोबर 2026 रोजी दिव्यांग व्यक्तींना मोफत मॉड्युलर पाय मिळणार आहे.

 त्यासाठी 9820599108/9371088911 या मोबाईल क्रमांकावर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. आणि शिबिराला येताना आधारकार्ड घेऊन येणे आवश्यक आहे.

कै. आमोद पानसे यांच्या स्मरणार्थ श्रीमती शुभलक्ष्मी पानसे यांच्या देणगीतून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांच्या सहयोगाने भारत विकास परिषद कोथरूड शाखा व दिव्यांग केंद्र पुणे यांचे मार्फत मॉड्युलर पाय, हात व पोलिओ कॅलिपर मोफत बसविण्यासाठी मोजमाप शिबिर घेण्यात येणार आहे. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून जवळच असणाऱ्या पितळी गणपती मंदिरासमोर हराळे वैष्णव धर्मशाळेत दिनांक 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या शिबिरात मॉड्युलर पाय आणि हात व पोलिओ कॅलिपर बसविण्यात येईल.

 आज आळंदी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर वीर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दिव्यांग ट्रस्टचे अध्यक्ष दत्ताजी चितळे यांनी प्रस्तावना केली. आणि दिव्यांग ट्रस्टचे विश्वस्त व दिव्यांग केंद्रप्रमुख विनय खटावकर यांनी शिबिराच्या संपूर्ण नियोजनाची व आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाविषयी माहिती दिली. याविषयी बोलताना खटावकर म्हणाले, कृत्रिम मॉड्युलर पायाची किंमत 50,000 पेक्षा जास्त व कृत्रिम हाताची किंमत 25,000/- रुपया पर्यंत आहे. पण या शिबिरात मॉड्युलर पाय आणि हात व पोलिओ कॅलिपर दिव्यांगांसाठी एकदम मोफत देण्यात येणार आहेत. परंपरागत जयपुर फूटपेक्षा हे आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय ऑटोफोल्ड असून वजनाने हलके आहेत. आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय बसवल्यानंतर दिव्यांग व्यक्ती चालणे, पळणे,पोहणे, उडी मारणे, वाहन चालविणे व शेती कामे इत्यादी प्रकारच्या दैनंदिन क्रिया करू शकतात. त्याचप्रमाणे सहा किलोग्रॅम पर्यंतचे वजन कृत्रिम हाताने उचलता येईल.

 भारत विकास परिषदेने 2024 मध्ये रौप्य महोत्सवी वर्षात घेतलेल्या 1000 दिव्यांगांच्या महाशिबिराची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. मागील पंचवीस वर्षात 35000 दिव्यांगांना भारत विकास परिषदेने मॉड्युलर पाय दिले आहेत.

 दिव्यांग व्यक्तींनी 23 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता आळंदी येथील हराळे वैष्णव धर्मशाळेत उपस्थित राहावे. या ठिकाणी दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग व्यक्ती बरोबर आलेल्या एका व्यक्तीला मोफत भोजन देण्यात येणार आहे. शिबिराची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 अशी राहील.

थोडे नवीन जरा जुने