सांगवी - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबूरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी येथे वाणिज्य विभागाच्या वतीने S.Y. व T.Y. B.Com. च्या विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रीय प्रकल्प अर्थात फिल्ड प्रोजेक्ट या विषयावर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके आणि वाणिज्य विभाग प्रमुख तथा महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. वंदना पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. पंडित शेळके म्हणाले की पुस्तकी अभ्यासाबरोबरच संशोधन वृत्ती विकसित होणे ही आजच्या काळाची गरज आहे आणि त्यासाठी क्षेत्रीय प्रकल्प हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. केवळ वर्गात बसून शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन निरीक्षण करणे, माहिती संकलित करणे आणि त्याचे विश्लेषण करणे यातून विद्यार्थ्यांमध्ये खऱ्या अर्थाने संशोधक वृत्ती निर्माण होते आणि हा प्रकल्प म्हणजे विद्यार्थ्यांच्या संशोधनाकडे होणारी पहिली वाटचाल आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. अमृता इनामदार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निर्धारित केलेल्या फिल्ड प्रोजेक्टच्या स्वरूपाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी संशोधनाची पद्धत, तथ्य संकलनाचे तंत्र, प्रश्नावली कशी तयार करावी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा योग्य व नैतिक वापर कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी वाणिज्य विभागातील डॉ. मनिषा त्र्यंबके यांनी कॉस्टिंग, डॉ. दीपाली चिंचवडे यांनी बँकिंग आणि डॉ. अमृता इनामदार यांनी मार्केटिंग या विषयांनुसार प्रकल्प कसे निवडावेत आणि त्याची मांडणी कशी करावी याबाबत विषय निहाय मार्गदर्शन केले तर अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. क्रांती बोरावके यांनी प्रकल्प लेखन करताना घ्यावयाची काळजी आणि अहवाल लेखनाची पद्धत याबाबत माहिती दिली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपाली चिंचवडे यांनी अत्यंत सुंदर रीतीने केले तर उपस्थितांचे आभार प्रा. अश्विनी कदम यांनी मानले. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी ओम काळे, शांतनू आंबुळगे, सानिया सय्यद यांच्यासह तब्बल ८७ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे छायाचित्रण प्रणित पावले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वाणिज्य विभागातील प्रा सुषमा सोनार आणि डॉ रश्मी भुयान यांनी देखील विशेष परिश्रम घेतले
