MGID Header Code
Code End

वसुलीसोबत वीजपुरवठ्याची गुणवत्ता सुधारा – दिनेश अग्रवाल

 


२०५ कोटींची थकबाकी चालू बिलासोबत वसूल करा

_महावितरणच्या कार्यकारी संचालकांचे क्षेत्रीय अभियंत्यांना निर्देश_

पुणे : वारंवार इशारा देऊनही २०५ कोटींची थकबाकी शिल्लक राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, ही थकबाकी ऑक्टोबर महिन्यात कोणत्याही परिस्थितीत वसूल करा, तसेच वीजपुरवठ्याची गुणवत्ता सुधारा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा, असा इशारा महावितरणचे कार्यकारी संचालक (वाणिज्य) दिनेश अग्रवाल यांनी पुण्यातील अधिकाऱ्यांना दिला.

पालक संचालक म्हणून अग्रवाल दर आठवड्याला पुणे परिमंडलाचा आढावा घेतात. शनिवारी (दि. ३) दुपारी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी वीजबिल वसुली, वीजपुरवठा, सेवा सेतू व सेवा संकल्प अभियान आदींचा उपविभागनिहाय आढावा घेतला. या बैठकीला प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, सुरेश सवाईराम, सहायक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) कीर्ती भोसले यांच्यासह पुणे परिमंडलातील सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते व अधिकारी उपस्थित होते.

अग्रवाल म्हणाले, “सप्टेंबर महिन्याअखेर २०५ कोटी ८७ लाख रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. पुण्यासाठी ही चांगली बाब नाही. ऑक्टोबर महिन्याच्या चालू बिलासोबत ही थकबाकी वसूल करा. पुढच्या शनिवारपर्यंत ही थकबाकी वसूल झालेली असावी. ऑक्टोबर हिटला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठ्याकडेही सर्वांनी लक्ष द्यावे. आपापल्या कार्यक्षेत्रातील वीजपुरवठा अखंडितपणे सुरू राहील यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यावी, तसेच वीजगळती रोखून महावितरणचा महसूल वाढवावा.”

सेवा सेतू आणि सेवा संकल्प अभियानाबाबतही सर्वांनी सजग राहण्याचे आवाहन करताना जास्तीत जास्त किऑस्क उभारून ग्राहकांना महावितरणच्या सेवांचा लाभ द्यावा, असे अग्रवाल यांनी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने