पिंपरी-चिंचवड | वार्ताहर : शिवानंद चौगुले | महाराष्ट्र जनभूमी न्यूज
पुणे : संस्कार भारती पश्चिम प्रांत, पिंपरी-चिंचवड समितीच्या वतीने आयोजित ‘निसर्गरंग २०२६’ या चित्रकला प्रदर्शनाचे बालगंधर्व कला दालन, शिवाजीनगर येथे उत्साहात उद्घाटन झाले.
पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चित्रकार व पर्यावरणमित्र सचिन निंबाळकर, संस्कार भारतीचे पश्चिम प्रांत महामंत्री प्रशांत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
निसर्ग आणि कलेचे अतूट नाते जपण्याचे आवाहन
चित्रकार सचिन निंबाळकर यांनी निसर्ग आणि कलेतील अतूट नात्याचे महत्त्व विशद करत प्रत्येक कलाकाराने किमान एक झाड लावून पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावे, असे आवाहन केले. प्रशांत कुलकर्णी यांनी संस्कार भारतीच्या कला, संस्कृती आणि परंपरांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी कलाकारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सचिव लीना आढाव यांनी पिंपरी-चिंचवडमधील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यामागील संस्थेची भूमिका स्पष्ट केली.
प्रवेशद्वारावरील शीतल कांबळे यांनी साकारलेली आकर्षक रांगोळी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरली. कार्यक्रमाची सुरुवात ध्येयगीताने, तर समारोप ‘संपूर्ण वंदे मातरम्’ने झाला. सूत्रसंचालन रती देशमुख यांनी केले, तर रमेश खडबडे यांनी आभार मानले.
संस्कार भारतीचे अध्यक्ष डॉ. पं. नंदकिशोर कपोते आणि उपाध्यक्ष प्रफुल्ल भिष्णुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. यावेळी अनेक कलाकार आणि कलारसिक उपस्थित होते.
३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान प्रदर्शन
‘निसर्गरंग २०२६’ हे चित्रकला प्रदर्शन ३, ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत बालगंधर्व कला दालन, शिवाजीनगर, पुणे येथे सर्व कलारसिकांसाठी खुले आहे. पिंपरी-चिंचवडमधील कलाकारांच्या कलाकृतींचा आस्वाद घेण्याची संधी या प्रदर्शनातून उपलब्ध झाली आहे.
