चिंचवड | वार्ताहर : शिवानंद चौगुले
निगडी : वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी भारतीय विचार साधना फाऊंडेशन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच भव्य राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (७ ऑक्टोबर) ते शनिवार (१० ऑक्टोबर) या कालावधीत निगडी प्राधिकरणातील सेक्टर २५ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या परिसरात हा मेळा भरणार आहे.
या मेळ्यात ५० हून अधिक प्रकाशकांची हजारो पुस्तके उपलब्ध होणार आहेत. इतिहास, संस्कृती, सामाजिक व राष्ट्रीय विषय, विज्ञान, शेती, पर्यावरण, योग, आरोग्य, संतसाहित्य, अर्थकारण, समरसता, थोर व्यक्तींची चरित्रे, कुटुंब प्रबोधन तसेच बालसाहित्य अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटांतील वाचकांना समृद्ध साहित्याची पर्वणी मिळणार आहे.
महापौरांच्या हस्ते उद्घाटन
मेळ्याचे उद्घाटन बुधवारी (७ ऑक्टोबर) सायंकाळी ६.३० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपमहापौर, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहतील.
साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
मेळ्यादरम्यान गुरुवारी (८ ऑक्टोबर) सायंकाळी ६.३० वाजता 'नाटकवाला' पुस्तकाचे अभिवाचन होणार आहे. शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सायंकाळी ६.३० वाजता पुस्तक प्रकाशन सोहळा, तर ७ वाजता साहित्यिक संवाद आयोजित केला आहे. शनिवारी (१० ऑक्टोबर) अभिवाचन, सौहार्द स्लाइड शो आणि कलावंत संवाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
वाचनप्रेमींना आवाहन
वाचनाची आवड वाढविणे, नव्या पिढीला दर्जेदार साहित्याची ओळख करून देणे आणि विचारांची समृद्ध देवाणघेवाण घडवून आणणे हा या मेळ्याचा उद्देश आहे. नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांनी केले आहे.
वेळ : ८ ते १० ऑक्टोबर, सकाळी ९.३० ते रात्री ८.३०.
स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, सेक्टर २५, निगडी प्राधिकरण.
