पुणे व सातारा येथे ऑक्टोबरमध्ये भरती मेळावा; पात्र माजी महिला वन कर्मचाऱ्यांनाही संधी
पुणे (वर्षा चव्हाण) : भारतीय लष्कराच्या १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको महारमध्ये भूतपूर्व सैनिक तसेच केंद्रीय व राज्य वन विभागातील पात्र भूतपूर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सैनिक (जनरल ड्युटी) पदाच्या १२९, तर ट्रेडसमनच्या १० अशा एकूण १३९ जागा भरल्या जाणार आहेत. भरती मेळावा १८ ते २१ ऑक्टोबरदरम्यान पुण्यातील खडकी येथे, तर २४ ते २७ ऑक्टोबरदरम्यान सातारा येथे होणार आहे.
पुणे आणि सातारा येथे भरती प्रक्रिया
पुण्यातील भरती मेळावा १८ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भगत पॅव्हेलियन, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, खडकी येथे होईल. त्यानंतर २४ ते २७ ऑक्टोबरदरम्यान सैनिक स्कूल, सातारा येथे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणी भरती प्रक्रिया सकाळी ५ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
१३९ पदांसाठी भरती
या भरतीमध्ये सैनिक (जनरल ड्युटी) पदाच्या १२९ जागा आहेत. तसेच ट्रेडसमनच्या १० जागांमध्ये सैनिक क्लार्क (जनरल ड्युटी) ७, हाऊसकीपर १, शेफ कम्युनिटी १ आणि धोबी १ या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.
कोणाला मिळणार संधी?
या भरतीसाठी सशस्त्र दलातील निवृत्तिवेतनधारक भूतपूर्व सैनिक तसेच केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागात किमान २० वर्षे सेवा केलेल्या भूतपूर्व महिला कर्मचाऱ्यांना पात्रतेनुसार संधी मिळणार आहे.
उमेदवारांची सेवानिवृत्ती किंवा सेवामुक्तीच्या तारखेपासून भरतीच्या तारखेपर्यंत पाच वर्षांच्या आत नोंदणी होणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराची वैद्यकीय श्रेणी ‘शेप-१’ असावी. चारित्र्य अनुकरणीय किंवा अतिशय चांगले असणे आणि कोणत्याही दिवाणी अथवा फौजदारी प्रकरणात सहभाग नसणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे सोबत आणा
भरती मेळाव्यासाठी येणाऱ्या उमेदवारांनी मूळ निवृत्तिवेतन आदेश (पीपीओ), मूळ डिस्चार्ज बुक व त्याची स्वयं-साक्षांकित प्रत, अधिवास प्रमाणपत्र, भूतपूर्व सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड व त्याची स्वयं-साक्षांकित प्रत, अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराची १० छायाचित्रे आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे, भरती मेळाव्याच्या ठिकाणी मोबाईल फोन आणण्यास परवानगी नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी ९१६८१६८१३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
