MGID Header Code
Code End

भोसरी-दिघी रस्त्यावरील धोकादायक विद्युत टॉवर तातडीने हटवा!


- भाजपा आमदार महेश लांडगे यांची महापारेषणला सूचना 

- भोसरी- दिघी रस्त्यावर टॉवर क्र. १७ मुळे वाहतुकीस अडथळा, अपघाताचा धोका

पिंपरी चिंचवड : भोसरी-दिघी मुख्य रस्त्याच्या मध्यभागी असलेला २२० के.व्ही. अतिउच्च दाब विद्युत वाहिनीचा मनोरा (टॉवर क्र. १७) वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याने तो तातडीने स्थलांतरित करण्यात यावा, अशी आग्रही मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) पुणे विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवून तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.

भोसरी-दिघी हा अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले असून, बहुतांश काम पूर्णत्वास आले आहे. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी असलेला महापारेषणचा अतिउच्च दाब विद्युत मनोरा अद्याप स्थलांतरित केलेला नाही. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्चून विकसित करण्यात येत असलेल्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यात अडथळा निर्माण होत असल्याचा मुद्दा आमदार लांडगे यांनी उपस्थित केला आहे.

विशेषतः दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक आणि अवजड वाहनांसाठी हा मनोरा धोकादायक ठरू शकतो. रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण होत आले असतानाही मध्यभागी असलेल्या मनोऱ्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि संभाव्य अपघाताचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मनोरा स्थलांतराचा विषय प्राधान्याने मार्गी लावणे आवश्यक असल्याचे आमदार लांडगे यांनी पत्रात नमूद केले आहे.

या मनोऱ्याच्या स्थलांतरासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने महापारेषण प्रशासनाशी यापूर्वी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळालेली नाही. प्रशासकीय पत्रव्यवहार आणि विभागीय समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणे योग्य नसल्याचे आमदार लांडगे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, महापारेषण आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने संयुक्त बैठक आयोजित करावी. टॉवर क्र. १७ च्या स्थलांतरासाठी आवश्यक तांत्रिक सर्वेक्षण, खर्चाचे अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता आणि आर्थिक तरतुदीची प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावी. तसेच, प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

भोसरी-दिघी रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी विद्युत मनोऱ्याचे स्थलांतर विनाविलंब पूर्ण करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या जीविताशी संबंधित या प्रश्नावर अधिक विलंब होऊ नये, यासाठी महापारेषण प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली आहे. 

प्रतिक्रिया: 

भोसरी-दिघी रस्त्याचे काँक्रिटीकरण बहुतांश पूर्ण झाले आहे. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी असलेला अतिउच्च दाब विद्युत मनोरा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित या प्रश्नावर प्रशासकीय दिरंगाई स्वीकारार्ह नाही. महापारेषण आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त समन्वयातून तांत्रिक व आर्थिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. टॉवर क्र. १७ स्थलांतरासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी अपेक्षा आहे.

- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

थोडे नवीन जरा जुने