आळंदी (अर्जुन मेदनकर) : माळवाडी, फुलगाव (ता. हवेली, जि. पुणे) येथील पुरातन हजरत चांद खान फकिर बाबा यांचा सालाबादप्रमाणे वार्षिक संदल व उरुस मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला असल्याची माहिती मुजावर श्री. नसीर खान यांनी दिली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या उरुसासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत संदल कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी फुलगाव ग्रामस्थ, युवक, महिला, जेष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, चऱ्होली बुद्रुक मुस्लिम कमिटी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन दिवस महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.
हजरत चांद खान फकिर बाबा दर्गा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व विविध रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती. मुजावर श्री. नसीर खान व मान्यवरांच्या हस्ते चादर अर्पण करून चांद खान फकिर बाबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वधर्मीय सलोखा व शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.
गेली दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम शांततेत संपन्न झाले. मुजावर श्री. नसीर खान यांच्या पत्नी, मुली, जावई, नातवंडे, फुलगाव ग्रामस्थ, श्री. खान परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक या सर्वांनी चांद खान फकिर बाबा यांच्या संदल व उरुस या धार्मिक कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.
