पुणे | वार्ताहर : शिवानंद चौगुले
पुणे शहराच्या आधुनिक विकासाच्या दिशेने आज आणखी एक ऐतिहासिक पाऊल पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी ऑनलाइन पद्धतीने पुणे मेट्रो मार्गिका क्रमांक ३ (माण-हिंजवडी-शिवाजीनगर)चे लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील चार नवीन मार्गिकांचे भूमिपूजनही करण्यात आले. सुमारे २१ हजार ८०० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे महानगर क्षेत्राच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा ऑनलाइन उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मनोहर लाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, विविध आमदार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हिंजवडी आयटी पार्कला थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी
पुणे मेट्रोची सुमारे २३ किलोमीटर लांबीची मार्गिका क्रमांक ३ ही 'पिंक लाइन' म्हणून ओळखली जाणार आहे. माण ते शिवाजीनगर (जिल्हा न्यायालय) असा हा मार्ग असून त्यामध्ये एकूण २३ स्थानके आहेत. यामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सुमारे ८,३०० कोटी रुपयांहून अधिक खर्चातून उभारण्यात आलेल्या या मार्गिकेवर पहिल्या टप्प्यात १७ स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू होणार असून उर्वरित स्थानके टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार आहेत. बुधवार, दि. ४ नोव्हेंबरपासून प्रवासी सेवा सुरू होणार आहे.
या मार्गिकेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मेट्रो संचालन महिला ट्रेन ऑपरेटरच्या माध्यमातून होणार आहे. तसेच एकूण विजेच्या गरजेपैकी सुमारे ३० टक्के वीज सौरऊर्जेतून उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दृष्टीने ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात चार नवीन मार्गिका
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून चार नवीन मार्गिकांचा यामध्ये समावेश आहे.
१. मार्गिका २-अ : वनाज ते चांदणी चौक.
२. मार्गिका २-ब : रामवाडी ते विठ्ठलवाडी.
३. मार्गिका ४ : खराडी ते खडकवासला.
४. मार्गिका ४-अ : नळ स्टॉप ते माणिकबाग.
या नवीन मार्गिकांमुळे खराडी, मगरपट्टा, हडपसर, स्वारगेट, माणिकबाग, नांदेड सिटी, पुणे कॅन्टोन्मेंट, वारजे तसेच वेगाने विकसित होत असलेल्या निवासी व औद्योगिक परिसरांना मेट्रोची सुविधा उपलब्ध होणार आहे.
पुणे-पिंपरी चिंचवडच्या विकासाला नवी गती
पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन्ही शहरे औद्योगिक, शैक्षणिक, माहिती-तंत्रज्ञान आणि व्यावसायिक क्षेत्रातील महत्त्वाची केंद्रे म्हणून विकसित झाली आहेत. मात्र वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि वाहतूक कोंडी ही दोन्ही शहरांसमोरील मोठी आव्हाने आहेत.
मेट्रोच्या विस्तारित जाळ्यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास, इंधनाची बचत होण्यास, प्रदूषण नियंत्रणास आणि प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. विशेषतः हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रवाशांसाठी भविष्यात अधिक सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
केवळ मेट्रो नव्हे, तर शहराच्या भविष्याची गुंतवणूक!
पुणे मेट्रोचा विस्तार म्हणजे केवळ प्रवासाची सुविधा नव्हे, तर शहराच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासासाठी केलेली दीर्घकालीन गुंतवणूक आहे. प्रवासाचा वेळ वाचल्यामुळे नागरिकांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. उद्योग, व्यापार, रोजगार आणि पर्यटन क्षेत्रालाही याचा सकारात्मक फायदा मिळू शकतो.
मात्र मेट्रोच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा खरा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानकांपर्यंत पोहोचणारी बससेवा, सुरक्षित पादचारी मार्ग, सायकल सुविधा, वाहनतळ आणि विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधील समन्वय तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.
पुणे शहराची ओळख आता केवळ ऐतिहासिक वारसा, शिक्षण आणि आयटी उद्योगापुरती मर्यादित न राहता आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून देशातील विकसित शहरांच्या दिशेने वाटचाल करणारी ठरणार आहे.
'वेळेची बचत, प्रदूषणमुक्त प्रवास आणि विकासाला गती' हा पुणेरी मेट्रोचा नवा संकल्प प्रत्यक्षात उतरला, तर निश्चितच पुणे महानगर क्षेत्राच्या विकासाचा हा नवा अध्याय ठरेल!


