संत तुकाराम नगर पोलिसांची दादागिरी, आम आदमी पार्टीचा तीव्र निषेध!
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आणि विविध गैरव्यवहारांबाबत आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या 'आम आदमी पार्टी' (AAP) पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाने भेट नाकारत थेट पोलीस बळाचा वापर करून स्थानबद्ध केले. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा आणि संत तुकाराम नगर पोलिसांच्या अरेरावीचा आम आदमी पार्टीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, "महानगरपालिका आयुक्तांना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि शहरातील भ्रष्टाचाराविरोधात आलेल्या पत्रांची दखल घेण्यासाठी वेळ मिळत नाही. नागरिकांना भेटायला टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाला भ्रष्टाचारात आणि 'टक्केवारी' गोळा करण्यातच रस आहे का?" असा रोखठोक सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
संत तुकाराम नगर पोलिसांची हुकूमशाही आणि दडपशाही!
आपल्या मागण्यांचे निवेदन सनदशीर मार्गाने देण्यासाठी गेलेल्या नागरिकांना आणि पदाधिकाऱ्यांना आयुक्त भेटत तर नाहीतच, उलट स्वतःचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी पोलिसांना पुढे करून आंदोलकांना ताब्यात घेतले जात आहे. या आंदोलनादरम्यान संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी अत्यंत बेजबाबदारपणे आणि हुकूमशाही पद्धतीने वागत आयुक्तांना भेटायला आलेल्या नागरिकांच्या थेट कॉलरला हात घालून त्यांना महापालिका भवनाबाहेर काढले.
लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने आपल्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या नागरिकांशी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी पोलिसांनी केलेले हे कृत्य अत्यंत निंदनीय, अन्यायकारक आणि बेकायदेशीर आहे.
आम आदमी पार्टीचा सवाल आणि इशारा:
"नागरिकांच्या कराच्या पैशातून वेतन घेणारे पोलीस आणि अधिकारी जनतेचे सेवक आहेत की भ्रष्ट प्रशासनाचे रक्षक?" "आयुक्तांना भेटायला आलेल्या नागरिकांची कॉलर पकडून बाहेर काढणे हे कितपत योग्य आहे?"
नागरिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न कितीही झाला, तरी आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहरातील भ्रष्टाचाराविरोधात शांत बसणार नाही. पोलिसांनी आणि प्रशासनाने केलेल्या या दडपशाहीविरोधात आणि गैरवर्तनाविरोधात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गृहमंत्रालयाकडे तक्रार नोंदवण्यात येईल.
यावेळी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, महिला अध्यक्ष कविता कोंडे देशमुख, प्रदेश युवक अध्यक्ष रविराज काळे, ऋषिकेश कानवटे, अमित म्हस्के, संजय कोने, विकी पासोटे, सुप्रिया गायकवाड, सुरेश बावनकर, योगेश बाबर, रेश्मा बाबर इत्यादी पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
तसेच महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने देण्यात आला आहे.
श्री. वैजनाथ शिरसाट
शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी
पिंपरी-चिंचवड शहर


