MGID Header Code
Code End

पुण्यात २० व २१ नोव्हेंबर रोजी दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तपासणी शिबिर

 


 प्रधानमंत्री दिव्याशा – वयोश्री केंद्र उपक्रमांतर्गत ADIP व RVY योजनांसाठी लाभार्थ्यांची तपासणी व नावनोंदणी

पुणे : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांच्या सक्षमीकरणासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या वतीने प्रधानमंत्री दिव्याशा – वयोश्री केंद्र (PMD-VK) उपक्रमांतर्गत विशेष तपासणी व नावनोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर व शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा रुग्णालय, सांगवी फाटा, औंध, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये केंद्र शासनाच्या सहाय्यक साधने व उपकरणे खरेदी व बसविण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करण्याच्या ADIP (Assistance to Persons with Disabilities for Purchase/Fitting of Aids and Appliances) योजनेअंतर्गत तसेच राष्ट्रीय वयोश्री योजना (Rashtriya Vayoshri Yojana – RVY) अंतर्गत पात्र दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या शारीरिक गरजा व आवश्यकतांचे मूल्यांकन करून त्यांची नावनोंदणी आणि पात्रता निश्चितीची प्रक्रिया राबविण्यात येईल.

या योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार मोटाराइज्ड ट्रायसिकल, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, चालण्याच्या काठ्या, कुबड्या, वॉकर, रोलेटर, सी.पी. चेअर, टीएलएम किट तसेच इतर आवश्यक सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. संबंधित उपकरणांचा लाभ हा योजनेच्या निकषांनुसार, वैद्यकीय तपासणी व पात्रता निश्चितीनंतर तसेच उपलब्धतेनुसार देण्यात येईल.

शिबिरासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड, दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड (दिव्यांग व्यक्तींसाठी), उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तसेच संबंधित योजनेसाठी आवश्यक असलेली इतर कागदपत्रे सोबत आणावीत. यापूर्वी सहाय्यक उपकरणांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी संबंधित योजनेतील लागू अटी व नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देणे, त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ करणे, स्वावलंबन वाढविणे आणि ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार उद्भवणाऱ्या शारीरिक अडचणींवर मात करण्यासाठी सहाय्य करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

पुणे जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्ती, दिव्यांग बालकांचे पालक, ज्येष्ठ नागरिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी या शिबिराची नोंद घेऊन निर्धारित दिनांकास आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

शिबिराचे ठिकाण : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा रुग्णालय, सांगवी फाटा, औंध, पुणे – ४११०२७.

दिनांक :२० व २१ नोव्हेंबर २०२६

वेळ : सकाळी १०:०० वाजल्यापासून

अधिक माहितीसाठी संपर्क : भाग्यश्री मोरे  ९९२२८२०८५० / ७८८७७२३९९७

आयोजक : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, औंध, पुणे

थोडे नवीन जरा जुने