MGID Header Code
Code End

ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचा थरार संपला; ‘झिंगर्स’ बनले २०२६ चे चॅम्पियन!

 


१८.५ गुणांसह पटकावला विजेतेपदाचा मानाचा चषक; वास्कॉन पूना लायन्स उपविजेता

— गोल्फ खेळाला मिळणार नवी दिशा; देशभर अशा स्पर्धांचे आयोजन व्हावे – अनिल सेवलेकर

पुणे : अचूकता, संयम, कौशल्य आणि सांघिक जिद्दीचा अनोखा संगम असलेल्या ऑक्सफर्ड प्रीमियर लीग (OPL) २०२६ या राष्ट्रीय गोल्फ स्पर्धेचा दिमाखदार समारोप झाला. सहा दिवस रंगलेल्या या स्पर्धेत अडवाणी रियल्टीच्या ‘झिंगर्स’ संघाने शानदार कामगिरी करत १८.५ गुणांसह विजेतेपदाचा मानाचा चषक पटकावला. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत झिंगर्सने आपले वर्चस्व सिद्ध केले.

स्पर्धेत वास्कॉन पूना लायन्स संघाने झिंगर्सला कडवी टक्कर दिली. १७.५ गुणांसह वास्कॉन पूना लायन्स संघाने उपविजेतेपद मिळवले, तर नागपूरच्या रोअरिंग टायगर्स संघाने १३.५ गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.

देशभरातील नामांकित संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक फेरीत खेळाडूंच्या कौशल्याचा आणि संयमाचा कस लागला. अखेरच्या टप्प्यापर्यंत गुणतालिकेतील चुरस कायम राहिल्याने स्पर्धेतील उत्कंठा वाढली होती. मात्र, सातत्यपूर्ण कामगिरी आणि सांघिक समन्वयाच्या जोरावर झिंगर्स संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या निसर्गरम्य मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात ईगल फोर्सेस, झिंगर्स, ग्रीन ग्लॅडिएटर्स, रोअरिंग टायगर्स, सुब्बन सनरायझर्स, द लीगशी क्लब, बर्डी स्क्वॉड, गोल्डन ईगल्स, बिनधास्त बॉईज, जॅग्वर्स आणि वास्कॉन पूना लायन्स यांसह विविध संघांनी सहभाग घेतला. सहा दिवसांच्या या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले.

गोल्फ खेळाला मिळणार नवी दिशा – अनिल सेवलेकर

गोल्फ खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून हा खेळ समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा स्पर्धांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे मत इंडियन गोल्फ ऑर्गनायझेशन असोसिएशनचे अध्यक्ष आणि ऑक्सफर्ड गोल्फ क्लबचे संस्थापक अनिल सेवलेकर यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, “गोल्फ हा खेळ केवळ काही विशिष्ट घटकांपुरता मर्यादित न राहता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. देशभरात अशा स्पर्धांचे आयोजन झाल्यास नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळेल. त्यातून गोल्फ खेळाचा प्रसार होण्यासह भारतीय गोल्फला नवी दिशा मिळेल.”

विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी अनिल सेवलेकर आणि नीलम सेवलेकर यांच्या हस्ते विजेत्या झिंगर्स संघाला मानाचा चषक प्रदान करण्यात आला. तसेच उपविजेत्या व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या संघांचाही गौरव करण्यात आला. यावेळी एस गोल्फिंगचे आदित्य मालपाणी,रोहन सेवलेकर यांची विशेष उपस्थिती होती.

ऑक्सफर्ड प्रीमियर लीगच्या यशस्वी आयोजनामुळे पुण्याच्या क्रीडा क्षेत्रात गोल्फच्या लोकप्रियतेला नवे बळ मिळाले असून झिंगर्स संघाच्या ऐतिहासिक विजेतेपदाने स्पर्धेचा समारोप उत्साहात झाला.

थोडे नवीन जरा जुने