नवी दिल्ली (वर्षा चव्हाण) : आजच्या डिजिटल युगात बहुतांश व्यवहार ऑनलाइन होत असले तरी अजूनही अनेक व्यवहारांमध्ये चेकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. विशेषतः मोठ्या रकमेच्या व्यवहारांमध्ये चेक हे एक सुरक्षित माध्यम मानलं जातं. मात्र, चेक बाउन्स होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आणि याच मुद्द्यावर अनेकांच्या मनात एक प्रश्न कायमच असतो – “फक्त 1000 रुपयांचा चेक बाउन्स झाला, तरीही तुरुंगवास होऊ शकतो का?
काय आहे कायदा?
नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा 1881 च्या कलम 138 नुसार, चेक बाउन्स होणं गुन्हा मानला जातो. चेक दिल्यानंतर खात्यात पुरेशी रक्कम नसेल, तर चेक परत येतो आणि त्याला 'डिशॉनर' म्हटलं जातं. अशा परिस्थितीत:
दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास, किंवा चेकच्या रकमेच्या दुप्पट दंड, किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते.
यात रकमेचं बंधन नाही – चेक 1000 रुपयांचा असो किंवा 1 कोटींचा, नियम सारखाच लागू होतो.
काय आहेत सुधारित नियम?
पूर्वी चेक बाउन्स झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी केवळ 1 महिन्याची मुदत असायची. पण आता ती 3 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे आता फसवणूक झालेल्या व्यक्तीला थोडा अधिक वेळ मिळतो. याचबरोबर, चेक बाउन्ससंदर्भातील तक्रारी ऑनलाइनही दाखल करता येतात, जे पूर्वी इतकं सोपं नव्हतं.
चेक बाउन्स होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी:
1.चेक देताना खात्यात पुरेशी रक्कम आहे याची खात्री करा
2.चेकवरची तारीख, रक्कम आणि सही बरोबर आहे याची तपासणी करा
3.चेक वापरण्यापूर्वी ते वैध आहे का ते पाहा (6 महिन्यांपेक्षा जुना चेक अमान्य होतो)
लक्षात ठेवा:
रक्कम कितीही असो, चेक बाउन्स होणं हे गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे चेक वापरताना जबाबदारीने आणि पूर्ण खात्री करूनच व्यवहार करावा, अन्यथा कायद्याने तुरुंगातही जावं लागू शकतं.