आंबेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतावर जाऊन भात लागवडीचा अनुभव घेतला. क्षेत्रिय भेटीच्या माध्यमातून शाळेने हा उपक्रम आयोजित केला होता.
पावसाळ्यात शेतकरी शेतीची कामे करतो म्हणजे नक्की तो काय करतो, हे पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कळावे. शेतकरी घेत असलेल्या कष्टामुळे आपणास धान्य कसे उपलब्ध होते. नांगर म्हणजे काय, त्याचे काम काय याची सर्वांगीण माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या विचारातून शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी दुंदा कुऱ्हाडे यांच्या शेतावर प्रत्यक्ष भात लावणीचा अनुभव घेतला.
अनेक विद्यार्थ्यांनी बैलजोडीचा कुळव हाकत शेतात चिखलणी करण्याचे काम केले. शालेय गणवेशात विद्यार्थी शेतात उतरले होते. दिवसभर भात रोप लावणी, चिखलणीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
शेतीपासून दूर जाणारी युवा पिढी शेतीकडे वळावी, विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, शेतीतील नव्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावी, यासाठी ‘एक दिवस बळीराजा’ साठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा जाधव यांनी सांगितले.
पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे ज्ञान मुलांसाठी उपयुक्त असते, या जाणीवेतून भात लागवडीचे आयोजन करण्यात आले होते. आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांनी भात लावणीचा प्रत्यक्ष अध्ययन अनुभव घेतला. भात रोपांची कशी लावणी करतात? हे मुलांना आज प्रत्यक्षात शेतावर शिकायला मिळाले.
या उपक्रमासाठी शेतकरी सखुबाई कुऱ्हाडे, संगिता कुऱ्हाडे, विमल कुऱ्हाडे, जालिंदर कुऱ्हाडे, सुनिल कुऱ्हाडे, संजय कुऱ्हाडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अश्विनी लोहकरे, मुख्याध्यापिका शोभा जाधव, उपशिक्षक संतोष थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणविस्तार अधिकारी शैला निमसे, केंद्रप्रमुख नयना चौधरी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
Ambegaon-Students-went-to-field-and-got-experience-of-rice-cultivation