पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार भवनासाठी स्वतंत्र जागेची मागणी; आमदार शंकर जगताप यांची पालिका आयुक्तांना लेखी सूचना

 


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकार भवन उभारण्यासाठी स्वतंत्र जागेची तरतूद प्रारूप विकास आराखड्यात करण्यात यावी, अशी लेखी सूचना आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे. या निर्णयामुळे शहरातील पत्रकारांना स्वतंत्र, सुसज्ज आणि हक्काचे व्यासपीठ  निर्माण होणार आहे.

मराठी पत्रकार संघाच्या वतीने आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत पत्रकारांचे प्रश्न मांडल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी व मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदार जगताप यांची भेट घेऊन पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत. त्यांच्या प्रश्नांची मला पूर्ण जाणीव असून त्यांच्या न्याय हक्कांसाठी आपण सदैव पाठीशी राहू, असे आश्वासन आमदार जगताप यांनी दिले. पत्रकारांचा आपल्यावर विश्वास असावा, पण आपण चुकलो तर त्यांनी ती चूक निर्भिडपणे निदर्शनास आणून द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत लक्षवेधी सूचना क्रमांक २४७३ द्वारे आमदार जगताप यांनी पत्रकारांसाठी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कल्याणकारी महामंडळ’ स्थापन करण्याची मागणी केली. यामार्फत पत्रकारांना आरोग्य विमा, अपघात विमा, निवृत्तीवेतन, निवासी सुविधा, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन यांसारख्या अनेक सुविधा मिळाव्यात, अशी स्पष्ट मागणी त्यांनी मांडली.

शंकर जगताप यांनी पत्रकारांच्या हितासाठी शासनाकडे खालील महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत:

* किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि निवासी सुविधा लागू कराव्यात
* पत्रकार, पत्रकारेतर कर्मचारी व मीडिया मालक यांची त्रिसदस्यीय समिती स्थापावी
* गावपातळीवरील पत्रकारांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी स्वतंत्र केंद्रे उभारावीत
* माध्यम क्षेत्रात शिस्त राखण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करावी

त्यांच्या या पुढाकारामुळे पत्रकारांच्या अनेक दीर्घकालीन मागण्या शासन दरबारी पोहोचल्या असून, भविष्यात त्याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
--
मा.शंकर चंद्रभागा पांडुरंग जगताप 

आमदार : चिंचवड विधानसभा

थोडे नवीन जरा जुने