मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत आमदार अमित गोरखे यांनी एक अत्यंत महत्त्वाचा विषय मांडत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्याची मागणी केली. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या "भारतरत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची मागणी सभागृहात केली.
आपल्या निवेदनात आमदार गोरखे यांनी अधोरेखित केले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साहित्य हे एक प्रभावी माध्यम म्हणून वापरले. त्यांच्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाचा वसा पुढे नेला.
गोरखे पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ कलाकृती नव्हत्या, तर सामाजिक जागृतीचे ते एक प्रभावी साधन ठरले. त्यांनी आपल्या साहित्यातून शोषित, वंचित, कामगार आणि शेतकरी यांच्या व्यथा तसेच आकांक्षांना वाचा फोडली. त्यांच्या या अतुलनीय योगदानामुळेच त्यांना यापूर्वी "साहित्यरत्न", "महाराष्ट्र भूषण" आणि "लोकशाहीर" अशा विविध उपाधींनी सन्मानित करण्यात आले आहे.
आमदार गोरखे यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले की, सध्या राज्यात विविध संघटनांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालये आणि तहसील कार्यालये आदी ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना "भारतरत्न" मिळावा यासाठी आंदोलने सुरू आहेत. जनतेचीही हीच तीव्र अपेक्षा आहे. या लोकभावनांची दखल घेत, आमदार गोरखे यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये ठराव संमत करून, केंद्र सरकारकडे अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी अधिकृत शिफारस करण्याची मागणी केली.
अखेरीस, गोरखे यांनी स्पष्ट केले की, अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करणे हे सामाजिक न्याय आणि परिवर्तनाची मूल्ये जपणाऱ्या भारताची खरी कृतज्ञता ठरेल.